Thursday 28 June 2012

मका खाणारी मांजर

पूर्वी मांजरांचे passion उंदीर हे होते. हल्लीच्या मांजरी उंदरांच्या वाट्याला जातच नाहीत. कदाचित त्यात ते थ्रील उरले नसावे. मासळीबाजारात कोळणींच्या पायाशी बक्कळ मांजरी घोटाळताना दिसतात. मासा आणि मांजर हे एक अभेद्य असे नाते आहे. बाळगोपाळांच्या पुस्तकातल्या मांजरी ह्या बहुतेक करून वाडग्यात ठेवलेले दुध पिताना दिसतात. मुलांनीही दूध प्यावे असा संदेश या मांजरीन्करवी मुलांना दिला जात असावा. जाहिरातीतील मांजरी 'व्हिस्का' या नावाचे फूड खातात. या मांजरींचे सोशल स्टेटस इतर मांजरीन्पेक्षा वरचे असते. 
माझी एक आत्या सुरतेला राहते. तिला समजायला लागल्यापासून तिच्या घरी मांजरींचा राबता आहे. माझी ही आत्या आणि मांजर हीच मुळी द्विरुक्ती आहे.  माझी आजी आत्याला माऊ म्हणूनच संबोधायची. आजपर्यंत विविध जातीच्या मांजरींनी माझ्या आत्याच्या घरी येऊन आपली वर्णी लावली आहे. त्यामुळे आम्हाला कुठेही मांजर दिसले की या सुरतेच्या आत्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.  आज माझी आत्या साठीची आहे. तरी अजूनही मांजरांनी तिची पाठ काही सोडलेली नाही. तिचे घर हे जणू काही आपल्याला आंदण मिळाले आहे अशा अविर्भावात ह्या मांजरी तिच्या घरात हिंडत असतात. घरातल्या सोफ्यावर बसण्याचा पहिला मान त्यांचा असतो. घरी आलेल्या पाहुण्यांनी कुठे बसावे बरे हा विचार करण्यात या मांजरी बिलकुल आपला वेळ खर्ची घालत नाहीत. ते त्यांचे बघून घेतील असा एकूण त्यांचा तोरा असतो. सोफ्यावर थोड्याशा जागेत आपण आपलं बस्तान बसवावं तर सोफ्यावर ऐसपैस पसरलेली मांजर आपल्याकडे रागावून बघत राहते. तिच्या या रोषाचा सामना करण्याइतके धीट आपण खचितच नसतो त्यामुळे मग आपल्याला बसण्यासाठी इतर ऑप्शनचा विचार करावा लागतो. 
माझी आत्या मांजरींशी खूप खेळते. त्यांच्याशी गप्पा मारते. प्रसंगी त्यांना रागावते, क्वचित एखादी चापटीसुद्धा मारते. पण या गोष्टीचे मांजरींना जराही वाईट वाटत नाही. आम्ही चार दिवस आत्याकडे राहायला म्हणून गेलो होतो. त्यावेळेस एक मिनू नावाची मांजर आत्याकडे यायची. ह्या मिनूला इतर खाद्यपदार्थांचे जरा वावडेच होते. माझी आत्या पूर्णत: शाकाहारी असल्याने तिच्याकडे येणाऱ्या मांजरींच्या मांसाहारी अपेक्षा नसायच्या. पण दूध, दहीभात असे सर्वसाधारण मांजरींचे आवडते पदार्थही तिला रुचायचे नाहीत. गोड पदार्थही तिच्या खास आवडीचे नव्हते. पण ज्या एकमेव पदार्थाची ती जबरदस्त fan होती तो पदार्थ म्हणजे मक्याचे कणीस आणि तेही अमेरिकन स्वीट कॉर्न ! ती आली की घरभर आधी कणीस शोधत, हुंगत रहायची. आत्याने कणीस उकडायला लावलेलं असायचं. त्या वासाने तिच्या तोंडाला पाणी सुटायचं.  ती ते कणीस पूर्ण उकडून होईपर्यंत घरात येरझारा घालत रहायची. एकदा का ते कणीस कुकरमधून तिच्या प्लेटमध्ये आलं की ती विलक्षण खुशीत यायची. ते गरमागरम कणीस निवावे म्हणून ती ते तोंडाने इथून तिथे ढकलत रहायची. आता ते कणीस आणि ती या व्यतिरिक्त तिला इतर जगाचं भानच नसायचं. त्या कणसाचा आस्वाद घेतल्यानंतरच मग मिशा चाटत ती मान वर करायची आणि सोफ्यावर पहुडायची.  त्या खाल्लेल्या रिकाम्या कणसाशीही ती बऱ्याचदा खेळत रहायची. पण बाहेर मक्याचे सोललेले दाणे मिळतात ते ती खायची नाही. अख्खे मक्याचे उकडलेले कणीस हे तिच्या लेखी परब्रम्ह!    
आज मिनू हयात नाही तरी मक्याच्या कणसाशी निगडीत असलेल्या तिच्या आठवणी पावसाळ्यात मक्याच्या गाड्या लागल्या की उफाळून वर येतात. गाडीवरील मक्याच्या कणसाची 'ब्रान्ड अम्बेसेडर ' म्हणून ती नक्की शोभली असती. 


Tuesday 26 June 2012

देवाचे मनोगत



बैसतो मी देव्हाऱ्यात
सोन्या-चांदीच्या वेढ्यात 
रोज उपास-तापास
नैवेद्यांचीही खैरात
भाळी माझिया चंदन
धूप-दीप, पुष्पमाला
बासनातल्या पोथीचा
कोंदाटून येतो गळा 
फुले वाहता वाहता 
तोंडी अश्लाघ्य व्यापार 
जळमटे वर्तनाची 
मला करिती बेजार 
सून अथक रांधते 
सासू तोंडाळ पिडते 
लेक पुरता दुर्वास 
मुले अविचारी भुते
कुठे मामला उलट 
सून करी सासुरवास 
आधुनिकता, विद्वत्ता 
यांचा अनाठायी सोस
सणासुदीच्या दिवशी 
भलतीच सजावट 
माझ्या कृपादृष्टीसाठी 
ह्यांची कोण खटपट 
 उसळतो गदारोळ 
रात्रंदिस माझ्यापुढे 
धक्काबुक्की, रेटारेटी
अंदाधुंदी चोहीकडे 
लोटांगण माझ्यापुढे 
डोळ्यांत छटा फसवी 
होतो का कुणी संन्यासी 
वस्त्रे नेसून भगवी?
भक्त भोग लावतात
नवसाचे बोलतात
वृष्टी लाचेची करत 
माझ्यावर अव्याहत 
नवी तऱ्हा क्यासेटची 
पारायणे गायत्रीची 
झाला देवांचा बाजार 
घसरण पुण्याईची 
काय पुजेची ही रीत 
रूढ जनमानसांत ?
कसे उजळावे दीप 
मांगल्याचे अंतरात ?
झालो पुरा हतबल 
पण उठता येईना 
आता गाठ माणसाशी 
कुठे आधार दिसेना  
कसा होऊ कृपावंत 
किती आवरू प्रक्षोभ 
देवत्वाचे हे प्रारब्ध 
माझे मला लखलाभ
संकटे ही कोसळती 
तरी उतती, मातती 
माझ्यातल्या सामर्थ्याची 
अशी येते का प्रचीती 
होतो निवृत्त आता मी 
द्यावी एवढीच भिक्षा 
सुळावर देवपण 
रद्द करावी ही शिक्षा 

Sunday 24 June 2012

Shravasti (श्रावस्ती )

Aanandabodhi tree 
Shravasti is a city of ancient India. It was one of the 6th largest cities in India during Gautam Buddha's lifetime.The city is located in Gonda district & is 120km north of Lucknow.
According to Mahabharata, the origin of Shravasti lies with the legendary king Shravasta of solar race who founded the city. In the 6th century BCE, during the reign of Prasenajit, the city rose to fame due to its association with Gautam Buddha & Mahavira. During Buddha's time it was the capital city of the kingdom of Kosala & its king was the disciple of Buddha. It was a beautiful city with vast amounts of agriculture & diversity. Buddha passed the greater part of his monastic life in Shravasti. Buddha's disciple Sudatta Anathapindika built a monastery for him at Jetavana.Conversion of a robber Angulimala, to the Buddha's path is the another local episode of this period. 
                                                                  Small stupas
Shravasti was not only the capital of a powerful kingdom, but also a hotbed of philosophical inquiry, where many schools of thought had already established themselves before Buddha. Mahavira the 24th Jain Tirthankara had a great following here. Shravasti is believed to be a birthplace of two more Tirthankara's - Sambhavanath & Chandra Prabha.  
Of the four Nikayas, 871 suttas are said to have been preached in Shravasti, 844 of which are in Jetavana. The commentaries state that Buddha spent 25 rainy seasons in Shravasti. Of the 25 rainy seasons, he spent in the monastery named Jetavana. It is the place where he gave the largest amount of discourses & instructions.
                                                                Twin miracle
King Ashoka visited Shravasti & erected two pillars on the eastern gate of Jetavana & built a Stupa in the vicinity.
Within these, the remains of three ancient buildings can be visited. Angulimala's stupa, Anathapindika's stupa,  & an old temple dedicated to Jain Tirthankara. The site of Jetavana monastery is the main pilgrim destination. Meditation & chanting is mainly done at the Gandhakuti ( Buddha's hut ). 
During the time of Kushans, Buddhism gained from royal patronage.The ruins of Shravasti were uncovered by Sir Alexander Cunningham in 1863.


I have created a slideshow. Kindly copy-paste the following link in the address bar & view the slideshow.
http://www.kizoa.com/slideshow/d2863052k2388191o1/shravasti-2



Tuesday 19 June 2012

लग्नाच्या बायका म्हणजे पायपुसणी नव्हेत

'नातिचरामी' हे विवाहाचं ब्रीदवाक्य असतं हे लग्नानंतर बहुतांश नवरे विसरूनच जातात. एकमेकांच्या साथीसोबतीने केलेला संसार चेहऱ्यावरची  समाधानाची घडी विस्कटू देत नाही. स्त्री -पुरुष हे एक-दुसऱ्यासाठी पूरक असतात. परस्परांच्या प्रापंचिक गरजांची पूर्तता विवाहाच्या माध्यमातून होत असते जी सर्वसंमत असते. परंतु लग्न लागते आणि विवाहितेची शारीरिक आणि मानसिक शक्ती पणाला लागते.  
बायकोवर अत्याचार करून तिला आपल्या मुठीत ठेवण्याची पद्धत अनेक पुरुषांना सन्माननीय वाटते. आपण पती आहोत म्हणजेच आपल्या बायकोवर हात टाकण्याचा, तिला वाट्टेल ते बोलण्याचा परवानाच जणू काही समाजाने दिलेला आहे अशी गोड गैरसमजूत अनेक नवरे करून घेतात. तिचा व तिच्या माहेरच्यांचा सतत पाणउतारा करणे, तिच्या कर्तृत्वाला तुच्छ लेखणे यात अनेकांना धन्यता वाटते. आपण आज्ञा करावी आणि आपल्या बायकोने ती तत्काळ पाळावी अशी यांची इच्छा असते. मी उठ म्हणताच तिने उठले पाहिजे आणि बस म्हणताच तिने बसले पाहिजे अशा भ्रामक कल्पनांनी  हे नवरे पछाडलेले असतात.    
बायकोला दार उघडायला उशीर झाला की वसकन अंगावर ओरडायचे, मनासारखे खायला केले नाही की शिव्या घालायच्या,  फोनवर कुणाशी बोलली की सारखा संशय घ्यायचा, एखाद्या प्रश्नाचे तोंड वर करून उत्तर दिले की थोबाडीत हाणायची हे बऱ्याच नवऱ्यांना पुरुषार्थाचे लक्षण वाटते. अनेक बायकाही पुरुषांच्या या तथाकथित समजुतींना आपल्या विनाकारण सोशिक वागण्याने खतपाणी घालत असतात. 
माझ्या ओळखीचे एक कुटुंब होते. ब्राह्मणकुलोत्पन्न म्हणून टेंभा मिरवणारे. त्या घरातील नवरा नामक दानव बायकोच्या उरावर बसून तिची यथेच्छ पिटाई करत असे. ती उर फुटेस्तोवर ओरडायची. ही रेकॉर्ड जवळ जवळ रोज वाजायची. सगळ्या सोसायटीवाल्यांना त्यांच्या घरातील गुपित एव्हाना नको इतके कळले होते. त्यांच्या पदरी दोन गोंडस मुली होत्या. त्यांच्या समोरच हे मारण्याचे प्रात्यक्षिक होत असे. त्या माणसाच्या तोंडी भयानक अपशब्द सतत असायचे. अशा वातावरणात ती बाई आणि तिच्या दोन लहान मुली राहत होत्या. त्या बाईचे माहेर सधन होते. तरीही ती बाई तिच्या दोन मुलींसकट त्याच घरात वर्षानुवर्षे खितपत पडली होती. शिवाय ती बाई स्वत: नोकरीही करीत होती. म्हणजेच नरकात सडत राहण्याची निवड तिचीच होती. हा असा मोडकळीला आलेला, कोणताही दर्जा नसलेला संसार करण्यात तिला नेमके काय स्वारस्य होते हे मला आजतागायत कळलेले नाही. 
आपल्यावर होत असलेला अन्याय निमुटपणे सहन करणे म्हणजेच नवऱ्याच्या अपप्रवृत्तीला खतपाणी घालणे ही साधी गोष्ट बायकांना कळत नाही का असे मला पोटतिडीकीने त्यांना विचारावेसे वाटते. हिंसा म्हणजे फक्त अंगावर हात उगारणे नाही तर शाब्दिक निंदा, अपशब्द, शिवीगाळ हेही हिंसेचेच प्रकार आहेत. माझ्या ओळखीचे एक महाशय स्वत: रात्री नऊ वाजता झोपतात आणि झोपायला जाताना टी.व्ही. बंद करतात. त्यानंतर त्या घरात कोणीही टी.व्ही. लावू शकत नाही. अगदी त्यांच्या बायकोला कितीही वाटले तरीही तिनेही लगेच निद्राधीन व्हायचे. ही कोणती मनमानी? ती घरातील कामांची निरवानिरव करून जरा शांतपणे बाहेर विसावते आहे तोवर लाईट्स ऑफ. टी.व्ही. बंद. तिला एखादे पुस्तक वाचावेसे वाटले तरी वाचायचे नाही, एखादी टी.व्ही.सिरीयल बघावीशी वाटली तरी बघायची नाही हा काय जुलूम? आणि अशा वेळी ती तोंड शिवल्यासारखी गप्प का म्हणून बसून राहते? तीही आज स्वत: कमावती आहे. स्वत:च्या पायावर उभी आहे. तरीही तिची ही कथा असेल तर मग ज्या बायका सर्वस्वी नवऱ्यावर अवलंबून आहेत त्यांची अवस्था नि:संशय आणखीच वाईट असणार.   
लहानपणापासूनच संसार म्हणजे तडजोड आहे हे मुलींच्या मनावर मोठ्यांकडून बिंबवले जाते. शिवाय आपल्या आई-वडिलांना त्या रोज पाहत पहातच मोठ्या होत असतात. नवऱ्याने तोंडाला येईल ते बोलायचे, प्रसंगी हात उगारायचा आणि बायकोने सहन करायचे ही शिकवण त्यांना आपसूकच मिळत असते. बायकांनो तुम्ही कितीही शिका, मोठ्या व्हा, कर्तृत्ववान बना, कमवा पण शेवटी नवऱ्याची बोलणी आणि मार खाण्यातच तुमच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असे कोणीतरी पिशाच्च या बायकांच्या कानात ओरडते आहे की काय असे काही वेळेस वाटू लागते. 
वास्तविक पाहता विवाहसंस्थेने नवरा-बायको या दोघांना समान दर्जा आणि समान हक्क बहाल केले आहेत. या नात्यात कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही. कोणी वरचढ नाही कोणी खाली नाही. एकमेकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा पुऱ्या करत सुखा समाधानाने संसार करणं या विवाह परंपरेत अभिप्रेत आहे. आपल्यापासून जन्मणाऱ्या मुलांचे उत्तम संगोपन करणे, त्यांना उत्तम संस्कार व शिक्षण देणे आणि त्यांचे भावी आयुष्य सुरक्षित करणे तसेच त्यांना आपल्या पायांवर उभे राहण्यास समर्थ बनवणे हे आई-वडिलांचे आद्य कर्तव्य असले पाहिजे. 
विवाहेच्छू मुलीला हे बघ एकदा तुझे लग्न झाले की आम्ही सुटलो, यानंतर तेच तुझे घर, नवरा सांगेल तसे वागायचे, तो ठेवेल तसे राहायचे, तो तुझा पतीपरमेश्वर आहे, तो तुला बोलला, त्याने तुला मारले तरी तू सहन केले पाहिजेस कारण तुझी बाईची जात आहे असा जो काही मौलिक मंत्र दिला जातो तो अत्यंत खेदजनक आहे, हास्यास्पद आहे, आक्षेपार्ह आहे. एकीकडे स्त्रियांना मातेसमान आदरपूर्वक वागवणाऱ्या शिवरायांच्या राज्यात राहायचे आणि याच स्त्रियांनी वर्षानुवर्षे पुरुषांकडून मिळणारी निंदनीय वागणूक सहन करायची ह्या परस्परविरोधी गोष्टी आहेत. 
स्त्री व पुरुष हे या संसाराचे परस्पर पूरक असे दोन ध्रुव आहेत. दोघेही समान आहेत, सन्मान्य आहेत, आदरणीय आहेत. या अखंड सृष्टीची निर्मितीही या परस्पर साहचर्यातून झालेली आहे. तेव्हा स्त्रीचा, पत्नीचा आदर करणे हे प्रत्यक पुरुषाचे कर्तव्य असले पाहिजे आणि असा आदर पतीकडून न मिळाल्यास त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे पत्नीचे संसारातील प्रयोजन असले पाहिजे. 

Monday 18 June 2012

प्रतिमा उरी धरोनी ............

मानवी मन हे संवेदनशील असतं. त्यांचं स्वरूप हे एखाद्या टीपकागदासारखं असतं. बाह्य जगाकडून ज्या काही प्रतिमा त्याला बहाल केल्या जातात त्या त्याच्याकडून जशाच्या तशा स्वीकारल्या जातात. स्वत:चं प्रतिबिंब जोवर आपण मनाच्या स्वच्छ आणि पारदर्शक आरशात निरखून पाहत नाही तोवर त्यात दडलेल्या सौंदर्याची अनुभूती आपल्याला घेता येत नाही. 
मन आपलं असतं, पण त्यात समाविष्ट होणाऱ्या विचारांमागील प्रयोजन लक्षात न घेता आपण त्यांना आपल्या मनात थारा देत असतो. उदा. तू रंगाने काळी आहेस हा दुसऱ्याचा विचार आपण स्वीकारतो. त्यामागील दुसऱ्याची आपल्याला कमी लेखणारी, हिणवणारी भावनाही आपण स्वीकारतो. त्याचा हेतू आपल्याला दुखावण्याचा, आपली मानहानी करण्याचा असू शकतो. ज्या क्षणी आपण त्याने आपल्याकडे प्रवाहित केलेला हा विचार मनाने स्वीकारतो त्या क्षणी आपल्या मनातील आपल्या प्रतिमेचे पतन होते.    आपला काळा वर्ण आपल्याला अधिकच जाचू लागतो. आपले रेखीव नाक-डोळे, आपले निर्व्यंग, सुदृढ शरीर, आपली तीक्ष्ण बुद्धी या धन प्रतिमांचा आपल्याला विसर पडतो. काळ्या या एकाच रंगात आपण आपले चित्र चितारतो. या एका ऋण प्रतिमेने आपल्या मनाचे खच्चीकरण होते आणि आपण जगाच्या दृष्टीने स्वत:ला न्यूनपूर्ण, कमनशिबी, अयोग्य ठरवतो. 
आपल्या घरातच रंग-रूपावरून, बौद्धिक क्षमतेवरून, शारीरिक उंचीवरून, शक्तीवरून केले जाणारे संमिश्र विचार आपल्या कानावर आदळत असतात. यातील काही विचार आपल्याकरिता धन असतात तर काही ऋण असतात. मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यात आपल्याला विशिष्ट अशी लेबले लावली जातात. शिक्षकांनी त्यांच्या डोळ्यांवर चढवलेल्या वेगवेगळ्या प्रतीच्या चष्म्यानुसार त्यांना विद्यार्थी प्रतीत होतात. हे सर्व धन वा ऋण विचार संवेदनशील मनात प्रवाहित होण्यास अजिबात वेळ लागत नाही. पैकी ऋण विचार मनात लवकर आणि खोलवर रुजतात. ह्या इतरांच्या विचारांच्या आधारे आपण आपले व्यक्तिमत्व पारखू लागतो. शालेय अभ्यासात इतरांच्या दृष्टीने स्कॉलर असलेला मुलगा अहंगंडात्मक विचार मनात रुजवतो तर इतरांच्या दृष्टीने ढ असलेला मुलगा न्यूनगंडात्मक विचार मनात रुजवतो. 
या प्रतिमांचा आपल्या पुढील आयुष्यात आपल्याला किती सकारात्मक उपयोग होतो हे कोणी प्रांजळपणे सांगू शकते का? आपण जी विद्या ग्रहण करतो किंवा जी विद्या आपल्याला परीक्षेपुरती शिकवली जाते ती त्या त्या वेळेपुरती महत्वाची असते. विद्या ग्रहण केली जाते अर्थार्जन हेतूने परंतु विचार ग्रहण केले जातात व्यक्तिमत्व घडण्याच्या हेतूने. आपला काळा रंग आपल्याला बौद्धिक अथवा शारीरिक दृष्ट्या विकल करू शकत नाही. आपला बुटकेपणा एव्हरेस्ट चढण्याच्या आड येऊ शकत नाही. हे आपल्याला माहित असूनही आपण असे दुसऱ्यांचे आपल्याबद्दलचे विचार मनात शोषून घेतो, या ऋण प्रतिमा स्वत:च्याच असल्यागत त्यांना आपल्यावर अधिराज्य गाजवू देतो.  
आपल्या मनात ठसलेली आपल्याबद्दलची ऋण प्रतिमा हळूहळू फोफावत जाते. आपण कोणत्याही योग्यतेचे, लायकीचे नाही,आपल्यातील कमतरतेमुळेच आपण सगळीकडे नाकारले जातो, आपल्याकडे कोणतीही क्षमता नाही असे वारंवार वाटू लागते. परिणामी आपला आत्मविश्वास लयाला जातो आणि आपण म्हणजे या विश्वाच्या पसाऱ्यातील अडगळ आहोत ही भावना वाढीस लागते. जी प्रतिमा आपल्याला नैराश्याच्या खाईत लोटते ती प्रतिमा आपल्याला उपकारक कशी होऊ शकेल असा साधा विचारही आपण त्या क्षणी करण्यास असमर्थ ठरतो. 
आपल्या मनातील आपली प्रतिमा ही आशावादी, प्रकाशदायी, उन्नत व दृढ असायला हवी. ती अढळ हवी. येणाऱ्या- जाणाऱ्याने आपल्याला वाट्टेल ती लेबले लावावीत आणि आपण अंतर्मनाची कवाडे उघडून त्यात ती वर्षानुवर्षे साठवून ठेवावीत असे होता कामा नये. आपल्याला न पटणारे दुसऱ्याचे विचार ऐकणे व स्वीकारणे ह्यात मुळात फरक आहे. आपण एखाद्या गोष्टीसाठी योग्य आहोत की अयोग्य याची निवड आपणच करायची असते. जशा दुसऱ्याच्या आवडी-निवडी आपल्या होऊ शकत नाहीत तसेच दुसऱ्याचे विचारही आपले असू शकत नाहीत. इतरांनी त्यांच्या प्रज्ञेद्वारे लादलेल्या आपल्याबद्दलच्या प्रतिमा स्वीकारणे आपल्याला खचितच बंधनकारक नसते. आपले व्यक्तित्व, आपले मन, आपले विचार यांच्याशी आपण परिचित असतो, इतर नव्हेत. 
इतरांनी दिलेल्या ऋण प्रतिमा स्वीकारून आपले अवघे आयुष्य त्या प्रतिमांच्या सोबतीत व्यतीत करणे हा आत्मघात आहे. हा आत्मक्लेशाचा व्रण उरी घेऊन जगत राहणे ही स्व-प्रतिमेची अवहेलना आहे. कारण ही प्रतिमा वांझ आहे. ह्यात कोणतीही आनंददायी निर्मिती नाही, सृजन नाही. ह्यात आशेचा अंकुर नाही. ह्यात प्रतिभेला फुटणारा धुमारा नाही. ह्यात स्व-प्रकाशक किरणे नाहीत की चैतन्याची कारंजी नाहीत.  
निजस्वरूपाला ओळखणे म्हणजेच परमेश्वराला ओळखणे हे ज्ञात असलेल्यांनी ह्या परकीय प्रतिमांना चातुर्याने चार हात लांब ठेवणे सर्वार्थाने हितकर आहे. 



Friday 15 June 2012

The Laws of Spirit World - अर्थात आत्म्याच्या जगाचे नियम

दिवंगत खुर्शीद भावनगरी यांचे हे पुस्तक आहे. शामक दावर या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकाची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. माणसाच्या बुद्धीच्या परीघाबाहेरील अनुभव या पुस्तकात कथन केलेले आहेत. मानवाची दृष्टी जिथपर्यंत पोहोचते तेवढेच हे जग सीमित नसून सामान्य माणसाच्या दृष्टीपथात न आलेले सर्वस्वी भिन्न असे जग अस्तित्वात आहे हे सांगण्याचा प्रयास या पुस्तकाद्वारे केला आहे. या अनुभवांवर विश्वास ठेवणे अगर न ठेवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन हे पुस्तक लिहिलेले नाही तर माणसाच्या बौद्धिक कक्षेत न येणारे विश्व या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न खुर्शीद भावनगरी या लेखिकेने प्रामाणिकपणे केला आहे. 
दिवंगत रुमी आणि खुर्शीद या दाम्पत्याला विस्पी आणि राटो ही दोन अपत्ये होती. अगदी तरुण वयातच एका दुर्घटनेत त्यांचे निधन झाले आणि रुमी व खुर्शीद यांचे जगच उध्वस्त झाले. मानसिक दृष्ट्या हे दोघे पुरते खचून गेले. सैरभैर झाले. यापुढील आयुष्य जगत राहणे हे त्या दोघांना अशक्यप्राय झाले. जगण्याची उमेदच नष्ट झाली. विस्पी आणि राटोच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी एका सर्वस्वी अनभिज्ञ अशा दूताकरवी या दाम्पत्याला काही संदेश पाठवले गेले. सुरवातीस एखाद्या सर्व सामान्य माणसाची जशी प्रतिक्रिया असते तशीच प्रतिक्रिया रुमी आणि खुर्शिदची होती. ज्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या आवाक्यात येत नाहीत त्या गोष्टींवर सहजासहजी विश्वास ठेवायची कुणाचीच तयारी नसते. परंतु या दूताकरवी सांगितल्या गेलेल्या काही गोष्टी इतक्या आश्चर्यकारक आणि अचूक होत्या की रुमी आणि खुर्शीद या दाम्पत्याला त्यावर विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. त्यांची मुले विस्पी आणि राटो रुमी आणि खुर्शीद यांच्याशी संपर्क करू पाहत होती. आम्ही या जगात खूप सुखी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करू पाहत होती. रुमी आणि खुर्शीदच्या खचलेल्या मनाला उभारी आणू पाहत होती. त्यांच्या इहलोकातील जगण्याचे प्रयोजन अजून संपलेले नाही हे त्यांना पटवून देऊ पाहत होती. 
मर्त्यलोकातील तसेच देहापलीकडील अवस्थेतील जग नियंत्रित करणारी एक वैश्विक शक्ती आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे शरीराला मृत्यू असतो पण शरीरातील चैतन्याचा स्त्रोत मात्र अक्षय असतो. नियोजित वेळी हे चैतन्य मानवी शरीराची साथ सोडते आणि या चैतन्याचा म्हणा किंवा आत्म्याचा पुढील प्रवास सुरु होतो. अनेक जन्मांनी संस्कारित झालेला हा आत्मा असतो. काही विशिष्ट प्रयोजनाकरिता पुनश्च हा आत्मा शरीर धारण करत असतो. सुखदु:खाचे अनेक भोग भोगत असतो. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे पुण्याचा तसाच पापाचा संचय होत असतो. सतकृत्य केल्याचे पुण्य जसे पदरी जमा होते तसे दुष्कृत्य केल्याचे वाईट कर्मही ज्याच्या त्याच्या खात्यात जमा होते. इहलोकात आर्थिक प्रगतीनुसार माणसाची पत ठरते तर मृत्युपलीकडील लोकात पारमार्थिक प्रगतीनुसार आत्म्याची पत ठरत असते. प्रपंचात राहून ज्याला त्या महावैश्विक शक्तीशी आपल्या कर्माने, वर्तनाने, आचरणाने जवळीक साधता आली ती व्यक्ती मृत्यूपश्चात चांगल्या स्तरावर ( लेव्हलवर )  पोहोचू शकते. 
एकूण सात स्तर असतात. परंतु स्पिरीट सोल हा स्तर प्राप्त होण्यासाठी मानवी आचरणही तसेच लागते. इहालोकापासून या स्तरापर्यंत काही इतर स्तरही असतात. आत्मा जितका सुसंस्कारित तितके उन्नत स्तर या आत्म्याला लाभतात.  सहाव्या आणि सातव्या स्तरातील सोल्स पुन्हा मानवी शरीर कधीही धारण करत नाहीत. त्यांची वाटचाल मोक्षाकडे असते. पहिल्या स्तरातील सोल्सचे जिणे अत्यंत हलाखीचे,भीषण आणि कष्टप्रद असते. आपापल्या कर्माप्रमाणे मृत्यूपश्चात माणसाला हे स्तर मिळत असतात. 
या जगातील अनेक थोर संतांनी माणसाला प्रपंचात राहूनही पारमार्थिक प्रगतीची कास धरायला सांगितली. माणुसकी हा धर्म प्रामाणिकपणे आचरण्यास सांगितला. अभिमान, अहंकार, क्रोध, द्वेष, सूडबुद्धी, लोभ, वासना या रिपूंचा त्याग करायला सांगितला. स्व-स्वरूपाला, स्वत:त वसलेल्या चैतन्याला ओळखण्यास सांगितले. माणसातील प्रेमाचा झरा वाहता ठेवण्यास सांगितले. कारण ते केवळ संत नसून द्रष्टे होते. मानवजातीच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी या थोर संतांनी जन्म घेतला होता. सर्वधर्मसमभाव हाच या संतांचा पिंड होता. संत कबीर गेल्यानंतर ते हिंदू होते की मुसलमान यावरून गदारोळ झाला आणि त्यांच्या देहाच्या जागी फुले आढळून आली यापेक्षा धर्मनिरपेक्षतेचा अधिक सबळ पुरावा कोणता? 
या आत्म्याच्या विश्वात कोणत्याही विशिष्ट धर्माला स्थान नाही. इहलोकात धारण केलेल्या शरीराने जो पाप-पुण्याचा संचय केला असेल त्यानुसार त्या आत्म्याची गती ठरत असते. दुसऱ्याला दिलेल्या दु:खानुसार, क्लेशानुसार त्या आत्म्याचे अध:पतनही  ठरलेले असते. आत्मा हा सर्वसंचारी असतो पण शरीर मात्र जडतेने बद्ध असते. आचार-विचार, सभोवतालची परिस्थिती यातून माणूस घडत असतो हे खरे परंतु अशी विशिष्ट अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती लाभण्यामागे माणसाची पूर्वकर्मे असतात. 
विस्पी आणि राटो या दोघांनी सुरवातीस एका माध्यमामार्फत आणि नंतर थेट खुर्शीदशी संपर्क साधून या आत्मांच्या जगातील अनेक रहस्ये कथन केली. खुर्शिदच्या हातातील लेखणीद्वारे हे दोघे आत्म्याचे अनोखे जग विशद करत गेले आणि वरील पुस्तकाचा जन्म झाला. हे बरोबर आहे की चूक, खोटे की खरे, विश्वसनीय की अविश्वसनीय हा उहापोह इथे अप्रस्तुत आहे. पण त्या दोघांनी जे कथन केले आहे ते खचितच समस्त मानवजातीस उपकारक आहे यात शंका नसावी. जिज्ञासूंनी वरील पुस्तक  जरूर वाचून प्रत्यक्ष पडताळा घ्यावा एवढीच इच्छा आहे. 

Sunday 10 June 2012

सामाजिक व्यंग

वैयक्तिक वैगुण्यामुळे समाजाकडून नाकारलेली, उपेक्षिलेली, बहिष्कृत केलेली माणसे स्व-कर्तृत्वाने त्यांच्या व्यंगावर मात करून  जेव्हा इतरांसाठी एक आदर्श प्रस्थापित करतात तेव्हा वास्तविक पाहता समाजाचा खुजेपणाच दृग्गोचर होतो. अगदी शाळकरी वयापासूनच हे सामाजिक वर्गीकरण सुरु होत असतं. हा मुका, हा बहिरा, हा आंधळा, हा पांगळा, हा थोटा, हा लुळा असे शिक्के माथ्यावर मिरवतच ही मुले मोठी होत असतात. सामान्य किंवा नॉर्मल मुलांच्या शाळेत यांना प्रवेश नाकारला जातो आणि इथेच ही आपपरभावाची बीजे मुलांच्या मनात रुजू लागतात. 
या मुलांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टीकोन गढूळलेला आढळतो. आपण त्यांची कीव करतो, त्यांना दयार्द्र, सहानुभूतीपूर्ण नजरेने पाहतो जे त्यांना कदापि मान्य नसतं. कुणाच्याही बुद्धिमत्तेचा कस हा त्यांच्या शारीरिक व्यंगावरून लागत नसतो. ही मुले परीक्षेत इतर मुलांइतकेच किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त मार्क मिळवू शकतात. अशा मुलांना जर कोणत्याही शाळेत प्रवेश मिळाला तर ह्या मुलांच्या मनातील न्यूनतेची भावना समूळ नष्ट होऊ शकते. शिवाय जी मुले निर्व्यंग आहेत अशांना या मुलांमध्ये मिळून मिसळून वागण्याचे बाळकडू मिळू शकते जे समाजहिताच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. 
रस्त्यावरून व्हीलचेअरवर एखादी व्यक्ती जाताना आढळली की त्यांच्याकडे कुतूहलमिश्रित दयेने बघितले जाते. ही माणसे जर कोणत्याही प्रकारे आपल्याकडून मदतीचा हात घेत नाहीत तर मग तुमच्यात काही कमतरता आहे अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहण्याचा आपल्याला काय अधिकार आहे ? आपण त्यांना दुबळी, असहाय आणि अगतिक माणसे समजतो हे आपलं मानसिक थिटेपण असतं. एखाद्या अंध व्यक्तीला त्यांच्या वैगुण्यापलीकडे जाऊन आपण समजून घेऊ शकत नाही हा आपल्या डोळस वृत्तीचा पराभव असतो. एखाद्या पांगळ्या व्यक्तीला त्याची खरी अडचण समजून न घेता हा चढण्या-उतरण्यास असमर्थ या दृष्टीने आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपले मानसिक पंगुत्व ठळकपणे अधोरेखित होत असते. 
ही माणसे अभिनय करतात, नाचतात, गातात, शारीरिक कसरती करतात, उच्चशिक्षण घेतात,  उत्तम अधिकारावर नोकऱ्या करतात, व्यवसाय करतात, परदेशवाऱ्या करतात, संसार करतात. मग कुठे कमी पडतात ही माणसे? का त्यांना सन्मान्य वागणूक समाजाकडून दिली जात नाही? का त्यांच्याकडे करुणार्द्र नजरेने पहिले जाते?  शारीरिक व्यंग असलेली माणसे ही फक्त लाचारीने भिक मागण्याच्याच लायकीची आहेत ही समाजाची मनोधारणा अतिशय लाजिरवाणी नाही का? 
जेव्हा एखाद्या तरुणीवर दिवसाढवळ्या मुठभर गुंडांकडून अत्याचार होतो तेव्हा अवतीभवती जमलेली निष्क्रिय बघ्यांची प्रचंड गर्दी कोणत्या डोळसपणाची साक्ष देते? अतिशय अश्लाघ्य बोलून एखाद्या व्यक्तीचे काढलेले धिंडवडे आपण जेव्हा कानाआड करतो तेव्हा ती आपण बहिरे असल्याची जाणीव नसते का? एखाद्या खिसेकापूला पकडण्यासाठी जेव्हा आपण आपल्या पायांना गती देत नाही तेव्हा हे आपलं पांगळेपण नसतं का? यावर सुज्ञांनी जरूर विचार करावा. 
बसमध्ये, ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी चढताना या व्यक्तींना विलक्षण कसरत करावी लागते. पण कोरडे कढ काढणे, हळहळणे या व्यतिरिक्त आपण काही करू शकतो हा विचार मनात येणे महत्वाचे आहे. निर्व्यंग, सुदृढ माणसांनी संघटीत होऊन सरकारला या सामाजिक अनास्थेविषयी लेखी निवेदन देणे गरजेचे आहे. या व्यक्तींसाठी येण्याजाण्याचे मार्ग सुकर करणे हे शासनाला बंधनकारक असायला हवे. अशा व्यक्तींसोबत वावरताना त्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतेची जाणीव न भासवणे ही आपली महत्तम जबाबदारी असली पाहिजे. त्यांच्या विचारांचा आदर करणे, त्यांना प्रोत्साहित करणे, वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे ही आपली भूमिका असायला हवी. त्यांना सहानुभूतीची नाही तर प्रेमाची, आपुलकीची गरज आहे हे आपल्या मनाला समजावता आले पाहिजे.  
यशशिखरे पादाक्रांत करण्यासाठी मानसिक उत्तुंगता लागते आणि अशी उत्तुंगता लाभलेली माणसे शारीरिक कमतरतेवर खुबीने मात करून असाध्य वाटेला आपल्या अंकित करतात. जिद्दीचे, परिश्रमाचे, चिकाटीचे पंख घेऊन जन्माला आलेली ही माणसे वाटेत सलणारे काटे अलवारपणे बाजूला सारून आपल्या पायाखाली गुलाबाची बाग फुलवतात.  आणि आपण जर मानसिक विकलांगतेचे बळी नसलो तर त्यांच्या या गरुडभरारी पुढे सहजी नत होतो. 

Wednesday 6 June 2012

बॉम्बस्फोट



बॉम्बस्फोट होतात. माणसे मारतात. लुळी-पांगळी होतात. शारीरिक आणि मानसिक आघाताने खचून जातात. आपण टी.व्ही.वरील दृश्ये पाहून अथवा पेपरातील बातम्या वाचून क्षणभर हळहळतो. नंतर कामाच्या व्यापात आणि काळाच्या ओघात या घटना इतिहासजमा होतात. परंतु परिस्थितीची ही टांगती तलवार नेमकी कुणावर, कसा आणि कधी घाला घालेल याचा काही नेम नसतो. यावर भाष्य करणारी प्रस्तुत कविता .......   



पळा पळा सारे बॉम्बस्फोट झाला  
जीव नुसता घाबरून अर्धमेला झाला
अंधार किंकाळ्या सर्वत्र धूर
कानांना दडे , रक्ताचा पूर
कुठेही कसाही दैवाचा घाला |
पळापळ, रडारड, जीवाची तडफड 
काळजाचे पाणी, सुटकेची धडपड
अमानुष वृत्तीचा कडेलोट झाला |
सामन्यांच्या जीवाला क्षणोक्षणी घोर
येईल का सुखरूप घरी माझे पोर?
नाठाळांच्या हाती विध्वंसाचा पेला |
माणुसकीच्या छाताडावर क्रौर्याचे तांडव
पदराआड लपले शासकीय पांडव
पोलिसी खाक्याही हतबल झाला |
रुग्णालयाशी राजकारणी दाटी
खाटेपाशी थांबते सांत्वनाची गुटी 
नोटांची फुंकर हळव्या मनाला |
आरोप-प्रत्यारोपांची नांदी
दृश्यांचे भांडवल, वाहिन्यांची चांदी
घायाळांचे सोयरसुतक कुणाला? 
संघटना स्वीकारतात जबाबदारी
त्यांच्या हाती आपल्या श्वासांची दोरी
निष्पापांचे जीव लागतात पणाला | 
लोकशाही राज्यातील असे हे आयुष्य
जीवनाचे न पेलणारे झाले धनुष्य
तयार व्हा कधीही समर्पणाला |

Sunday 3 June 2012

सरकारी खाक्या- एक चिंतनाचा विषय

कुठल्याही सरकारी ऑफिसात जा, तिथे फायलींचे ढीगच्या ढीग दिसतात. शासकीय आमंत्रणाची वाट पाहत त्या बिचाऱ्या वर्षानुवर्षे एखाद्या कपाटात किंवा टेबलावर धुळीची वस्त्रे अंगावर लपेटून निपचित पडून असतात. काय असते ह्या फायलींमध्ये दडलेले? ह्या फायलींचे ढीग कधीच कसे कमी होताना दिसत नाहीत? ह्या फायली हातावेगळ्या न करता सरकारी कचेरीतील अधिकारीवर्ग आणि त्यांच्या हाताखालचे लोक कसे स्वस्थ बसू शकतात? इत्यादी प्रश्नांनी अस्वस्थ होणारे, बेचैन होणारे आपण असतो. सरकारी ऑफिसमध्ये येऊन पाट्या टाकणारे नाहीत.
काही सामाजिक-राजकीय अहवाल, निवेदने, अर्ज, योजना ,तक्रारी आदी विषयीचा मजकूर त्यात असू शकतो. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रसार व्हावा, विजेअभावी लोकांना अंधारात बसण्याची पाळी येऊ नये, गरिबांना रास्त दरात अन्न, औषधे, राहावयास घरे मिळावीत, सरकारी शाळा, हॉस्पिटल्स यांची दुरावस्था सुधारावी,  जागोजागी पाणवठे व्हावेत, स्त्री भृणहत्या थांबावी, लहान मुले व स्त्रिया यांचे लैंगिक शोषण होऊ नये, पैशांचा काळा बाजार करणाऱ्यांसाठी कडक कायदे अमलांत आणावेत, अंमली पदार्थांची तस्करी थांबावी, सार्वजनिक मालमत्तेचे योग्य जतन व्हावे, शेतकरी बंधूंना कर्जमाफी द्यावी, कुपोषित मुलांना पौष्टिक अन्न मिळावे अशा अनेक विनंत्या, निवेदने, मागण्या त्या फायलीत बंद असू शकतात. 
खरंच काय असते नेमके या सर्व फायलींचे भवितव्य? एका टेबलावरून दुसऱ्या टेबलापर्यंतचा  या फायलींचा प्रवास तसा गोपनीयच  असतो.  टेबलावरून म्हणण्यापेक्षा टेबलाखालून म्हणणेच जास्त सयुक्तिक ठरावे. टेबलाखालचे हातातले वजन जितके जास्त, तितकाच जास्त वेग ती विशिष्ट फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर सरकण्याचा असावा. रेशनिंग ऑफिसमध्ये कधीही जा, ज्याचे काम चुटकीसरशी झाले आहे असा एकही माणूस दिसत नाही. ही रांगेत निमूट उभी असलेली माणसे महिनोंमहिने एकाच कामासाठी पुन्हा पुन्हा खेटे घालत असतात. आपण कितीही सौजन्याने त्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना विचारणा केली तरी आपल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सरळ कधीच मिळत नाही. उत्तर देण्याची पद्धत अत्यंत तुसडी असते. जणू काही सात जन्माची शिक्षा भोगायला आपण या सरकारी कचेऱ्यांत आलेले असतो.  व्होटर्स कार्ड मिळवण्यासाठीही नाना पंचायती कराव्या लागतात. माझ्या यजमानांचे पेन्शन घ्यायला जवळजवळ पाचएक वर्षे मी पोस्टात जात होते. वर्षातून एकदा या पोस्टखात्याला आपण जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो. म्हणजे जिवंत माणूस पोस्टातील अधिकाऱ्यांसमोर उभा राहतो आणि आपण जिवंत असल्याचा लिखित पुरावा एखाद्या व्यावसायिकाच्या सहीनिशी त्याच्यापुढे सादर करतो. म्हणजे हाडामासाच्या माणसाच्या अस्तित्वाचे महत्व कमी आणि लिखित गोष्टीचे जास्त! 
अनेक वेळा व्होटिंग लिस्टमध्ये आपले नाव नसते. वर्षानुवषे आपण एकाच जागी राहत असतो. आपले नाव व्होटिंग लिस्टमध्ये का नाही याचा कितीही पाठपुरावा केला तरी आपल्या पदरी निराशाच पडते. परिणामी आपण मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. महानगर टेलिफोन एक्स्चेंजमधून अनेक वर्षे माझे टेलिफोन बिल दुसऱ्याच पत्त्यावर यायचे. ते कुटुंब माझ्या ओळखीचे असल्याने माझे बिल मी त्यांच्याकडून कलेक्ट करत होते. किती वेळा टेलिफोन ऑफिसमध्ये गेले. तेथील अधिकाऱ्यांशी बोलले. लिखित अर्जही दिला. पण बिल फक्त त्याच पत्त्यावर यायचे. कारण म्हणे मीच त्यांना असा चुकीचा पत्ता अर्जात लिहून दिला होता. आता स्वत:चा चुकीचा पत्ता देण्याइतकी मी अशिक्षित नाही. नंतर दिलेल्या लिखित अर्जात माझा (त्यांना चुकीचा वाटलेला) पत्ता पुनश्च लिहून दिला होता. पण मी न केलेल्या चुकीची शिक्षा अगदी टेलिफोनचे कनेक्शन काढून टाकेपर्यंत मी पुरेपूर भोगली.  
न बदलणे हा सरकारी कर्मचाऱ्यांचा बाणा आहे. चौकशीसाठी आलेल्या जनतेला उर्मट आणि तुसडी उत्तरे देणे हा सरकारी कर्मचाऱ्यांचा बाणा आहे. आधीच त्रस्त झालेल्या जनसामान्यांना त्याच त्याच कामासाठी अनेक वेळा खेटे घालायला लावणे, त्यांना अनंत काळासाठी तिष्ठत ठेवणे, क्षुल्लक कामासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ सातत्त्याने खर्ची घालणे असे करण्याने या कर्मचाऱ्यांना एक आसुरी आनंद मिळत असावा. कामाचे स्वरूप बघून त्यानुसार टेबलाखालची देवाणघेवाण ठरवणे यात मात्र यांचा हात कोणी धरू शकणार नाही. एरवी सौजन्याचा संपूर्ण अभाव असलेली ही माणसे लाच घेताना मात्र अजीजीने हसल्यासारखे करतात. काम पटापट व्हायला हवे असेल तर आपला हात सैल सोडावा असे याचे मौन बोलत असते. तुमची तत्वे, तुमचा प्रामाणिकपणा यांना जर मुरड घालता आली तरच तुमची डाळ या सरकारी कचेरीत व्यवस्थित शिजू शकते. अन्यथा तुमचा वेळ तुम्हाला अतिशय क्षुल्लक कामासाठीही कैक वेळा गहाण टाकावा लागतो, सहनशक्ती वाजवीपेक्षा अधिक ताणावी लागते. तत्वांना जितके जास्त कवटाळाल तितकीच कामे अधिक लांबणीवर पडत जातात. या कर्मचाऱ्यांचा घेण्याचा शिरस्ता लोकांच्या इतका अंगवळणी पडलेला असतो की एखादे वेळेस एखाद्याने काही मागितले नाही तर माझे काम होणार नाही असेच वाटू लागते. चांगुलपणावरचा विश्वास उडायला लागतो. 
सरकारी खाते हे नाव ज्या कुणी दिले आहे ते शंभर काय पाचशे टक्के खरे आहे. जे सतत फक्त खायचा विचार करते ते खाते. जे कितीही खाऊन कधीच संतुष्ट नसते ते खाते. जे कमी कामाच्या बदल्यात जास्तीत जास्त खाऊ पाहते ते खाते. इतके खाऊनही ज्याला कधीच अजीर्ण होत नाही ते खाते. 
या खात्याचा कारभार हा जनतेसाठी सामाजिक चिंतनाचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे.