Tuesday 31 January 2012

मूलभूत सुविधांचा दुष्काळ

आपला भारत प्रगतीपथावरील देश आहे असे म्हणावे तर या देशातील अनेक खेड्यांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये मूलभूत सुविधांचा विलक्षण दुष्काळ आहे. एकीकडे अवघ्या जगाला कवेत घेणारे संगणक युग आणि दुसरीकडे साध्या अक्षरांशीही ओळख नसणारी माणसे असे विसंगत चित्र दिसते आहे. 
निवडणुकांवर अमाप पैसा उधळून स्वत:ला सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करणारे उमेदवार देशातील गरिबी, निरक्षरता दूर करण्यासाठी झटताना कधी दिसत नाहीत. केवळ पाणी आणण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना काही किलोमीटर दूर चालून जावे लागते. त्यांचा रोजचा किती वेळ ह्या पायपिटीत जात असेल? ज्या सरकारी बंगल्यांवर चोवीस तास पाणी धो धो वाहत असते त्यांना कधी चुकूनही ह्या ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टांची कल्पना येते का?  या अतिआवश्यक मूलभूत गरजांचा विचार करण्यातच यांचे आयुष्य सरते. राहायला पक्की घरे नाहीत, पाण्याचा दुष्काळ, अन्नाची वानवा, विटकी-फाटकी वस्त्रे या त्यांच्या अवस्थेचे दायित्व स्वीकारायला सरकारी यंत्रणा पुढे सरसावत नाहीत फक्त निवडणुकांचा मोसम आला की काही काळापुरती, मतप्राप्तीसाठी यांना सुविधांची गाजरे दाखवली जातात. शिक्षणाचा आणि यांचा दुरान्वयानेही संबंध नसतो. इथे रोज स्वत:चे आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या इतरांचे आयुष्य जगवायचा झगडाच इतका भीषण असतो की मुळाक्षरे गिरवण्याचे यांच्या ध्यानीमनीही येत नसावे. 
अनेक शहरांतील महानगरपालिकेच्या शाळांमधील दृश्यही भयावह असते. गळकी छप्परे, पोपडे उडालेल्या भिंती, दुर्गंधीयुक्त प्रसाधनगृहे, अपुरी शालेय साधनसामुग्री अशा स्थितीत मुले 'शिक्षणाचे धडे' घेतात. त्यांना स्वच्छतेचा वस्तुपाठ दिला जातो. शाळेच्या इमारतींच्या बाह्यावास्थेवरून इथे, या वास्तूत मुले शिकतात तरी कशी असा प्रश्न माणसाला पडावा. हीच मुले इतर मुलांप्रमाणे या देशाची संपत्ती असणार असतात. या देशाचे ते जबाबदार, सुज्ञ नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पडणार असतात.  वर्षामागून वर्षे जातात. सत्तांतरे घडतात. राजकीय उलथापालथ होते परंतु एकही राज्यकर्त्याला ही शालेय दुरावस्था बदलावीशी, सुधारावीशी वाटत नाही. म्हणजे घाणेरड्या, पडक्या,गळक्या,रंग उडालेल्या, कळकट, सुविधांपासून वंचित असलेल्या  वास्तूत मुलांनी निमुटपणे बसून आपले शिक्षणाशी नाते जोडायचे आणि स्वत:ला अंधाऱ्या गर्तेतून सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करायचा अशी राज्यकर्त्यांची धारणा असते.
भारतात कुपोषित बालकांची संख्याही लक्षणीय म्हणावी अशीच आहे. पोट खपाटीला गेलेली, बरगड्या दिसणारी, अनेक आजारांचे माहेरघर झालेली ही मुले जनावरांप्रमाणे कचऱ्यातून अन्न  शोधत असतात. वाढत्या लोकसंख्येला आळा न बसल्याने अशा मुलांची समस्याही गंभीर रूप धारण करते आहे. अशा मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक सरकारी योजना कागदावरच राहतात. भुकेने ग्रस्त झालेल्या या चिमुरड्यांसाठी प्रत्यक्षात कोणतीही योजना अवतरत नाही आणि भूकेकंगालांच्या माथी फक्त अन्नासाठी वणवण लिहिली जाते. देशाचे भविष्य असणारी ही मुले भविष्य नामक अंधारात अनंत काळापर्यंत खितपत पडतात.  
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तुम्ही अद्ययावत सोयींच्या, सुख-सुविधांच्या कितीही गप्पा मारा पण जोपर्यंत समाजातील दुर्लक्षित घटकांच्या या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत तोपर्यंत देशातील अंतर्गत विषमता ही एक शोचनीय स्थिती बनते. लाखो, करोडोंनी जे पैसे धार्मिक सणांवर, उत्सवांवर, सभांवर,निवडणुकांवर, समारंभांवर उधळले जातात त्यातील काही पैसा जरी समाजातील ही विषमता दूर करण्यासाठी खर्च केला गेला तर पंचतारांकित हॉटेलासमोरील फाटक्या झोपड्यातही अन्नाचा वास दरवळेल. 

Sunday 29 January 2012

जिणे एकटीचे ..........

अनेक वर्षे सुरक्षित कोशात राहिलेली, वावरलेली स्त्री अचानक एका आघातासरशी असुरक्षित होते. तिचं जग असलेला तिचा संसार उधळला जातो आणि तिचा एकाकीपणा गडद होतो. अनेक स्त्रियांच्या वाट्याला येणारे हे सत्य असले तरी प्रत्येक स्त्रीची या सत्याशी सामना करण्याची मानसिकता वेगवेगळी असू शकते. या एकाकीपणाची तीव्रता वयाच्या हिशोबातही भिन्न असू शकते.
माझ्या वयाच्या बत्तिसाव्या वर्षी या आघाताला मी सामोरी गेले. माझ्यावर दोन मुलींची जबाबदारी होती. आघाताची जखम ओली असतानाच अनेक अनुभवांना मी सामोरी गेले. आपल्याकडे कर्तेधर्ते हे फक्त पुरुषच असतात असा एक निव्वळ गैरसमज आहे. पुरुषाइतकीच कर्तृत्व गाजवण्याची क्षमता स्त्रीमध्येही असते हेच कबूल करायला अनेक जिभा कचरतात. पेपरातून वाचलेल्या अशा एखाद्या बातमीचा उदोउदो होतो, त्या कणखर, कर्तबगार स्त्रीची प्रशंसा होते पण आपल्या घरात किंवा आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रीच्या धैर्याची,कणखरतेची किंवा कर्तबगारीची प्रशंसा करणारे अभावानेच सापडतात.
सांत्वनाच्या निमित्ताने घरी येऊन घर पाहणे, घरातल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेणे, अशी स्त्री तरुण असल्यास तिच्या स्वभावाचा, मानसिकतेचा अंदाज घेणे, तिच्या मुलींबद्दल अतीव जिव्हाळा असल्याचे दाखवणे ही नैमित्तिक कर्मे अनेकजण करतात. विशेषकरून अशा स्त्रीला नोकरीचा आधार नसेल, तिचे शिक्षण फारसे नसेल तर बाहेरील आधारस्तंभ अधिक सोकावतात. त्या स्त्रीला खरोखरच कोणाचा आधार हवा आहे का याचा विचार या 'सुज्ञ' लोकांकडून फारसा केला जात नाही. आपणच जणू काही या कुटुंबाचे पोशिंदे आहोत अशा अविर्भावात हे वावरू लागतात.  
माझ्यावर असा प्रसंग जेव्हा गुदरला तेव्हा अनेकजणांना असा प्रश्न पडला होता की माझे पुढे कसे होणार. तशी मला बऱ्याच जणांकडून विचारणाही झाली. माझे काय होणार म्हणजेच माझी पुढची पोटापाण्याची व्यवस्था काय हा प्रश्न जरी माझ्यासमोर होता तरी ह्या प्रश्नाचे उत्तरही मलाच शोधायचे होते. वास्तविक पाहता ह्या लोकांचे माझ्या दैनंदिन आयुष्याशी, माझ्या आर्थिक परिस्थितीशी काहीच देणे घेणे नव्हते तरी असे प्रश्न मला अशा परिस्थितीत विचारण्यात त्यांना धन्यता वाटत होती. माझे कुटुंब म्हणजे माझ्या दोन मुली वयाने लहान असल्यामुळे माझ्यावर अवलंबून होत्या. त्यांना कसलीही उणीव न भासू देणे, त्यांच्या स्वप्नांची, इच्छांची पूर्तता करणे यासाठी मला प्रयत्नशील होणे प्राप्त होते. मार्ग मला शोधायचा होता आणि त्या शोधलेल्या मार्गावरील काट्याकुट्यांना शह देत मार्गक्रमणाही मलाच करायची होती. त्यामुळे इतरांच्या कासावीस होण्याला तसा फारसा अर्थ नव्हता. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी नाकारून माझ्या कुटुंबाची धुरा वाहण्याची मानसिकता त्यांची नक्कीच नव्हती आणि त्यांच्याकडून कसलीही मदत स्वीकारण्यात मला स्वारस्य नव्हते. 
समाजामध्ये अशा गोष्टी अनुभवताना मला असे दिसून आले की ह्या दु:खद घटनेमुळे तिच्याकडे आणि तिच्या मुलांकडे पाहण्याची समाजाची नजर बदलते. ह्या एकाकी स्त्रीला कुणी वाली नाही असा एक आसुरी आनंद देणारा गैरसमज काही लोकांच्या मनात फोफावतो. हीचे आणि हिच्या मुलांचे आता काहीच चांगले होऊ शकणार नाही अशी जाणीव अनेकांच्या मनात मूळ धरू लागते. त्यामुळे  अशा परिस्थितीतून स्व-प्रयत्नांनी स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला वर आणणारी स्त्री इतरांच्या असूयेचा विषय ठरते. 
हळदी-कुंकवाची आमंत्रणे, सौभाग्यालंकार, ओट्या भरणे, नावापुढे सौ. लावणे इत्यादी गोष्टींना ती वंचित होते. आजकाल अगदी चित्रपटांत दाखवल्याप्रमाणे अशा स्त्रियांनी जरी पांढऱ्या साड्या नाही नेसल्या तरी त्यांचा विशिष्ट पेहराव अनेकांच्या भुवया उंचावतो. ती एखाद्या समारंभाला गेल्यावर ठराविक नजरानजर होते. तिच्या  दिसण्यावर, वागण्यावर तिच्या पाठीमागे टीका-टिप्पणी होत राहते. तिला लग्नाचे आमंत्रण येते. जावे की न जावे या दुग्ध्यात ती असते. नाही गेलो तर वाईट दिसेल म्हणून ती जाते.तिथे अनेक सुवासिनींचे घोळके नटून-थटून बसलेले असतात. त्यांच्या केवळ नजरांनीच तिला बहिष्कृत झाल्यासारखे वाटायला लागते. तिच्या परिचयाची माणसे अशा प्रसंगी तिला टाळू पाहतात. लग्न लागल्यानंतर हळदी-कुंकू देणाऱ्या सुवासिनींचे हात तिच्यापाशी आल्यावर थबकतात. इतरांचीही नजर तिच्यावर असतेच! तिची  घुसमट, तिची  घालमेल फक्त तिलाच ठाऊक असते. अशा समारंभांना उपस्थित राहिल्याबद्दल ती निव्वळ पश्चात्ताप व्यक्त करत राहते. 
आज संपूर्ण जग जरी प्रगत होत चालले आहे तरीही समाजमन मात्र वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांच्या जोखडातून आणि बुरसटलेल्या विचारांतून बाहेर येऊ शकलेले नाही. घरी-दरी अशा स्त्रीचे खच्चीकरण होत असते. तिची मुलेही स्वत:ला कसोशीने या आघातातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना 'नॉर्मल' आयुष्य जगायचे असते. मित्र-मैत्रीणीत मिसळायचे असते. जगण्याचा आनंद लुटायचा असतो. पण येणारी-जाणारी माणसे त्यांना भेटल्यानंतर उसासे सोडत, गहिवर काढत मुलांच्या मनातली पोरकेपणाची जाणीव ठळक करत राहतात. विसरू पाहणारे दु:ख, कालौघात बोथट होऊ पाहणाऱ्या दु:खद जाणीवा समाज त्यांना सहजासहजी विसरू देत नाही.   
काही काही प्रथांची, रुढींची,विचारांची तर मला मजाच वाटते. बायको नसलेला पुरुष आपल्या मुलांची लग्ने पाटावर बायकोच्या नावाची सुपारी मांडून करू शकतो पण नवरा नसलेल्या स्त्रीला मात्र अशी मुभा नाकारली जाते. अशा एकट्या पुरुषांकडे समाज विचित्र दृष्टीने पाहत नाही जसा बायकांकडे पाहतो. अशा पुरुषांच्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येत नाही. त्यांचे अर्धांग हरपल्याची कोणतीही चिन्हे त्यांच्या पेहरावातून, अलंकारांतून आविष्कृत होत नाहीत. त्यांच्याकडे दयनीय, दयार्द्र नजरेने पहिले जात नाही.पुरुष आणि स्त्री हे समाजव्यवस्थेतील स्वतंत्र घटक असूनही त्यांच्या बाबतीतील सामाजिक संकेतांमध्ये हा जो दुजाभाव आढळून येतो तो म्हणजे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे दारूण अपयशच आहे. 
आज समाजात वेगवेगळ्या वयोगटांतील अनेक स्त्रिया हे असे उपेक्षित जिणे जगतात. समाजमन, समाजातील जाती जितक्या मागासलेल्या तितकी एकटीच्या वाट्याला येणारी दु:खाची तीव्रता जास्त! काही स्त्रिया दुसरे लग्न करून सामाजिक पत पुनश्च मिळवण्याचा आटापिटा करतात तर काही फक्त स्वत:चीच सोबत पसंत करतात. संगणकाच्या माध्यमातून अवघे जग कवटाळू पाहणारी माणसेही संकुचित विचारांना, आचारांना कवटाळणे सोडत नाहीत. स्त्री विवाहित असो, अविवाहित असो, सौभाग्य हरपलेली असो शेवटी ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे पटवून घेण्याची निरोगी मानसिकता काही मोजक्याच लोकांमध्ये आढळते. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचे समाजातील स्थान नाकबूल करण्याचा हक्क कोणालाही नाही. 
अनेक पिढ्या जन्मतात आणि काल:पटलावरून पुसल्या जातात. विचारांनी माणूस उत्क्रांत होत राहतो. यंत्रयुगात क्रांती होत राहते. नवे विचार, नव्या कल्पना भविष्यकालीन सामर्थ्याचे द्योतक असतात. शिशिरातील पानगळही जुने विचार,चालीरीती त्यजून नव्या गोष्टी अंगीकारण्याचे बाळकडू माणसाला देत असते. हे वैचारिक भान जेव्हा माणसा-माणसांत रुजेल तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने  प्रगतीपथावर असेल! आणि अशा समाजात सौभाग्यवती स्त्रियांच्या कुंकवाइतकेच महत्व आणि प्रतिष्ठा सौभाग्य हरपलेल्या स्त्रियांच्या कर्तबगारीला मिळेल! 

Thursday 26 January 2012

जातधर्म- कविता


जन्म खेळाया मिळाला 
जातीधर्माच्या कवड्या 
उच्च, सवर्ण, दलित 
वड्या पाडाव्या तेवढ्या  
जातीधर्माच्या नावाने
होते उदरभरण 
खेळीमिळीचा पापुद्रा
आत जात्यांध सारण
सरकारी कागदांत 
जात-धर्म भरायचे 
समता आणि बंधुता 
त्यांचे काय करायचे?
आम्ही भारतीय सारे 
जाती-धर्म आम्हा प्यारे
खेळवूया आनंदाने 
उच्चनीचतेचे वारे
सूर्य हिंदू की मुस्लीम?
चंद्र महार की मांग?
जात कोणती तयांची?
कूळ त्यांचे काय सांग
आम्ही ब्राम्हण हुशार
तुम्ही दलित बेकार
आम्ही मराठे निडर
बाकी टरफले फार
मान-सन्मानांच्या राशी
उच्च मुजोर पायांशी
चपलांचे मानकरी
फिरती उपाशी-तापाशी
काय 'स्वातंत्य्र' साधले?
काय 'समान' जाहले?
सौंदर्याच्या वर्खाआड  
किती कुरूप झाकले?
जातीधर्माच्या आरोळ्या
रोमारोमांत भिनल्या
कर्वे, फुले, आगरकर
उगा नाचल्या बाहुल्या
राजकारण मातीचे 
त्याला लिंपण जातीचे 
व्रत घेतले निष्ठेने 
मानवाला नासायाचे



Sunday 22 January 2012

भीक- कविता


ट्रेनमधील भीक मागणारे ते गोंडस मूल
असेल आठ-दहा वर्षांचे
पिंजारलेल्या खरखरीत केसांचे
विटलेल्या शर्टाच्या फाटक्या बाहीने 
नाकातून ओघळणारा शेंबूड पुसत ...
त्याच्या समस्त दारिद्य्राला छेद देणारे 
त्याचे गोबरे गाल, तुकतुकीत तुपाचे..... 
याच्या वयाची मुले निमूटपणे शाळेत जातात 
आईने दिलेला खाऊ खातात
होमवर्क करतात आणि 
फावल्या वेळात कॉमप्युटरशी खेळतात 
शाळेचे आणि ह्याचे काय नाते?
होमवर्कचे आणि ह्याचे काय नाते?
कॉमप्युटरचे आणि ह्याचे काय नाते?
आईचे आणि ह्याचे तरी ...............
आता मी अधिकच करुणार्द्र दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं
तो आता माझ्यापर्यंत पोहोचायच्या प्रयत्नात 
त्याचा इवलासा काळवंडलेला हात 
आता माझ्यासमोर पसरलेला 
मी किती भीक घालू?
त्या भिकेचे हा काय करेल?
मी त्याला अख्खे पाच रुपये दिले 
आणि कृतार्थ झाले
आता तो वडापाव-मिसळ काहीतरी नक्की खाईल
आजाच्यापुरती त्याच्या पोटाची सोय 
उद्या पुन्हा तीच लाचार वणवण
चार-आठ आण्यासाठी 
पसरलेल्या हातावरच्या रेषांमधून वाहणारी!

मराठी असे (?) आमुची मायबोली

आम्ही मराठी भाषिक आहोत असे अभिमानाने सांगणारे आज संख्येने फार मोजके आहेत. मराठी भाषेला जो मुलायम साज संत ज्ञानेश्वरांनी दिला, त्याच मराठी भाषेला स्वत:च्याच मातीत उपेक्षिताचे जिणे जगावे लागते आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
आज अनेक मराठी घरांतून मराठी अभावानेच बोललं जातं. याचं एक कारण असं असावं की आपण मराठी बोललो तर चारचौघांत आपल्याला कमी लेखतील अशी भीती युवा पिढीला असावी. मराठीऐवजी इंग्रजी बोलल्यास 'इम्प्रेशन' पडतं हा ही एक  फोफावलेला गैरसमज आहे. आपल्या आईवर प्रेम करायला कुणी शिकवायला लागत नाही आणि आईवरील प्रेम हे कमीपणाचे लक्षणही मानले जात नाही मग मातृभाषेवर प्रेम करणे हा काय जागतिक गुन्हा समजला जातो का? 
अनेक चांगल्या समजल्या जाणाऱ्या शाळांमधून मराठी भाषेविषयी फारशी आस्था आढळून येत नाही. मराठी लिहिताना होणाऱ्या व्याकरणिक चुका दाखवण्याबद्दल बरेच शिक्षक उदासीन असतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मराठी हा विषय सक्तीचा असल्याने मराठी भाषिक असलेली आणि नसलेली मुले योग्य मार्गदर्शना अभावी भाषेचे लचके तोडताना दिसतात. र्हस्व, दीर्घ, आकार,उकार,काना,मात्रा,वेलांट्या या भाषांतर्गत व्याकरणाच्या भानगडी इंग्रजी भाषेत नसल्याने मायमराठीपेक्षा मुलांना इंग्रजी जवळची वाटू लागते. मराठीतून निबंध लिहिणे म्हणजे शिक्षा असा मुलांचा समज होतो. मुळात या भाषेची महती, या भाषेचे सौंदर्य मुलांना पटवून देण्यात घरी पालक आणि शाळेत शिक्षक कमी पडतात. एखाद्या कथेचा अगर कवितेचा आस्वाद घेणे तर लांबच पण साधे अंक,वाऱ,सण सुद्धा मराठीतून माहित नसावेत आणि तेही मराठी घरांतील मुलांना ह्याला काय म्हणावे? 
हिरवे हिरवे गार गालिचे- हरित तृणांच्या मखमालीचे किंवा श्रावणमासी हर्ष मानसी किंवा एक तुतारी द्या मज आणून या काव्यांमधील सौंदर्याचे दर्शन आणि आनंदाची अनुभूती मुलांना कशी येणार? कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, बालकवी, केशवसुत, केशवकुमार हे कधीतरी एखाद्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातून डोकावतात एवढेच! एरवी या समस्त कवीजनांचा आणि युवा पिढीचा दुरदूरचाही संबंध नाही. व्हॉट इज श्रावण? असे विचारणारी मराठी मुले आहेत. आता श्रावण म्हणजे काय माहित नाही, श्रावणातील निसर्ग कसा दिसतो ते माहित नाही तर श्रावणावरील कविता काय कप्पाळ कळणार? 
सोमवार, मंगळवार म्हणजे इंग्रजीत कुठला डे किंवा अठ्ठेचाळीस, एकोणपन्नास म्हणजे इंग्रजीत कुठला नंबर हे न समजणारी खूप मराठी मुले आहेत. 'यू नो, माय सन स्पीक्स ओन्ली इंग्लिश' असं एक मराठी आई तिच्या मराठी मैत्रिणीला तोंडावर सांगून आपला भाव वधारवत असते. हळूहळू घरातलं हे अ-मराठी कल्चर मुलांच्या चांगलंच अंगवळणी पडतं आणि मग मराठी वाचन, मराठी गाणी, मराठी गोष्टी, मराठी संवाद या गोष्टींची आणि या मुलांची कायमची ताटातूट होते. 'चांदोबा', 'किशोर' वाचणारी मुलं 'डाऊन मार्केट' वाटायला लागतात. आजकाल बऱ्याच मराठी घरांत सातत्याने परदेशवाऱ्या  करणारी माणसे असतात. ती हे इंग्रजीचं वारं घरात खेळतं ठेवायला मदत करतात. 
आपल्या भावना आपल्या मातृभाषेतून व्यक्त करण्यातील महत्व अनेकांना समजलेलंच नसतं. पाश्चात्य देशांतील अनेक अभ्यासू, भारतात येथील संस्कृतीचा, परंपरांचा, भाषेचा, संत-साहित्याचा अभ्यास करण्यासाठी, त्यावर संशोधन करण्यासाठी येत असतात पण आपल्याच लोकांना मात्र या भाषेचा, साहित्याचा गंधही नसतो. टाळ-मृदुंगांच्या गजरात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याविषयी पाश्चात्यांना कुतूहल असते. संत-साहित्यावर पी एच डी करणाऱ्या एका परदेशी विदुषीने टी.व्ही.वर एकदा 'पसायदान' म्हटल्याचे मला आठवते. मी एम.ए. ची परीक्षा देत असताना ' ३० मार्कांचे ज्ञानेश्वर, २० मार्कांचे तुकाराम आणि ४० मार्कांचे नाटककार देवल मी तयार ठेवले आहेत' असे काही परीक्षार्थींचे मौलिक विचार माझ्या कानावर पडले होते. केवढा हा विरोधाभास!  
फर्ड इंग्रजी बोलणारा माणूस तेवढा हुशार मग अस्खलित मराठी बोलणारा माणूस काय मद्दड असतो? भाषा कुठलीही असो, ती उत्तम बोलता यायला हवी, प्रत्येक भाषेची इज्जत करायला हवी याबद्दल दुमत नाही पण आपल्या आईला बाजूला सारून दूरच्या आत्याला तिच्या जागी बसवण्याचा अट्टाहास का? जिथे आवश्यक आहे तिथे ती भाषा जरूर बोलली गेली पाहिजे. पण घरी ताटावर बसल्यावर तरी 'भात' वाढ म्हणाल की 'राईसच'  म्हणणार? 'माझ्या आईच्या हातच्या थालीपीठाची सर कश्या कश्यालाही   नाही' या वाक्याचा जसाच्या तसा इंग्रजी अनुवाद करून दाखवावा असे आव्हान पुलंनी त्यांच्या पुस्तकातून दिले होते. तात्पर्य काय तर प्रत्येक भाषेची गोडी ही वेगळीच असते. 'थंडीने गुलाब सुकत आहे' हे भाषांतरित वाक्य ती मजा ,तो लुत्थ्फ आणू शकत नाही. प्रत्येक भाषेची नजाकत, नखरा, ऐट ही वेगळीच असते. कुठलीही भाषा आवडणे, न आवडणे ही वैयक्तिक बाब जरी असली तरी मराठी मातीत जन्माला येऊन मराठी भाषेचे बोट सोडून देणे हे करंटेपणाचेच लक्षण आहे. 
या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर पुन्हा एकदा जन्माला यावेत असे मला मनोमन वाटते. 

Friday 20 January 2012

श्लील आणि अश्लील

उत्तम दर्जेदार विनोद हा कोळशाच्या खाणीतून हिरा शोधण्याइतकाच दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललाय. केवळ विनोदच नाही तर अगदी साधंसुध बोलणंही आजकाल कानावर पडणं कठीण झालंय. प्रत्येक वाक्यागणिक एखाद-दुसरा अर्वाच्च्य शब्द जर आला नाही तर नरजन्माचं सार्थक झाल्यासारखं अनेकांना वाटत नाही. 
बीभत्स, अश्लील अंगविक्षेप, हातवारे करून लोकांना हसवणं, येत जाता माणसांची त्यांच्या विशिष्ट लकबीवरून टिंगल-टवाळी करणं हे पुढारलेल्या माणसाचं लक्षण समजलं जातं हे आमचं दुर्दैव आहे. अगदी शाळेतील लहान लहान मुलेही अत्यंत घाणेरड्या आणि सामान्य माणसाला लाजवेल अशा भाषेत एकमेकांशी संवाद साधत असतात.  लोकलमध्ये ऐन गर्दीच्या वेळी बायकांमधली भांडणे ज्यांनी अनुभवली आहेत त्यांना हा भयंकर प्रत्यय नक्की आला असेल. इतक्या खालच्या थराला जाऊन या बायका एकमेकांवर दोषारोप करतात की सभ्य माणसाला घाणीची आंघोळ झाल्यासारखी वाटावी. 
रिक्षा सिग्नलला थांबताच दबा धरून बसलेले तृतीयपंथी येतात आणि अंगाला हात लावत भिक मागतात. आपण दुर्लक्ष केले किंवा अंगाला हात लावू नका असे कितीही सौम्य भाषेत सांगितले की त्यांची खास भाषा सुरु होते आणि सिग्नल संपेपर्यंत  ती भाषा आपल्याला ऐकावी लागते. 
आजकाल अनेक वाहिन्यांवर बाष्कळ विनोदाची शेते उगवलेली आपल्याला दिसतात. त्यांची एकमेकांशी व्यावसायिक स्पर्धा असल्या कारणाने आपल्या शोचा  टीआरपी वाढवण्यासाठी त्यांना नाना युक्त्या लढवाव्या लागतात. एका हिंदी कॉमेडी शो मध्ये अतिशय हीन दर्जाचे विनोद करून प्रेक्षकांना हसवण्याचा खटाटोप केला जातो. अचकट-विचकट हातवारे करणे आणि डबल मीनिंग असलेले विनोद करणे हा तर बहुतांश कॉमेडी शोजचा स्थायीभावच झाला आहे. आपल्या या शोचा यंग जनरेशनवर  काय परिणाम होतो आहे याची तमा त्यांना कुठे आहे? अशा या विनोदवीरांचे थर्ड ग्रेड विनोद ऐकण्यासाठी यांना अनेक 'Award function' मध्ये बोलावले जाते. यांना मान-सन्मान, लौकिक प्राप्त होतो. कुणी आपल्या जाडेपणाचं तर कुणी आपल्या सुकडेपणाचं भांडवल करताना आपल्याला दिसतं. दुसऱ्याच्या व्यंगावरही या अश्लील विनोदांची फवारणी पदोपदी होत असते. प्रेक्षक हे विनोदी चाळे बघतात आणि टाळ्या वाजवतात. लहान मुले या कार्यक्रमातून त्यांना हवी ती दीक्षा घेतात. हे विनोद जरी कालांतराने विसरले गेले तरी त्यांनी दिलेली संथा अनेक रुपात पुढे येतंच राहते.  
कुटुंबाचा कर्ता असलेला कुटुंबप्रमुख आपल्या बायको-मुलांना बिनदिक्कत शिवीगाळ करतो आणि त्याच्या असल्या संस्कारांच्या छत्राखाली मुले लहानाची मोठी होतात. कित्येकजण मदिरेच्या आहारी गेल्यानंतर इतकी घाणेरडी भाषा वापरतात की आपण चांगल्या सभ्य,सुसंस्कृत घरातले आहोत याचाही त्यांना विसर पडतो. नाक्यावरचे टपोरी समोरून चाललेल्या आय-बहिणींचा अनेकदा अर्वाच्च्य शब्दांनी उद्धार करत असतात.
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, सोसायटीत अनेक तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना आढळतात. ते आपल्याच प्रणयलीलांत  मग्न असल्याने आपल्या आजूबाजूला अनेकजण वावरत आहेत, आपल्या या कृत्यांकडे बघत आहेत याचा त्यांना पत्ताच नसतो. अनेक शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी म्हणून खाली उतरतात आणि ही प्रणयदृश्ये बघत शाळेची वाट धरतात. नको त्या वयात नको त्या गोष्टींची प्रचीती त्यांना येत असते. त्यांना कोणी हटकण्याचे पुण्य केले तरी हे प्रणयवीर निर्ढावल्यासारखे दुसरी एखादी जागा निवडतात. समाजाच्या हिताचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनाही या गोष्टी आक्षेपार्ह वाटत नाहीत काय असे विचारण्याची वेळ आता आली आहे.  
व्यवसायातील संघर्षामुळे, बाजारीकरणामुळे, प्रसारमाध्यमांमुळे आणि सामाजिक,कौटुंबिक भान हरवल्यामुळे  श्लील आणि अश्लील यांतील सीमारेषा आता पुसली जाण्याच्या मार्गावर आहे.

शाळा- कविता



तळागाळातील पोचे आलेल्या जुनाट ट्रंकेसारखी 
गावाच्या खबदाडातील ती जीर्णशीर्ण शाळा .....
घनगर्द वृक्षराजीत विरघळून गेल्यासारखी 
राजकीय वादळवाऱ्याचे उडालेले लोट 
थेट शैक्षणिक मनसुब्यांवर 
खुराडेवजा वर्गात भिंतीवर तग धरलेले 
एक काळे फळकुट 
पांढऱ्या खडूचे फिकट सारवण अंगभर पसरून
एक मोडलेल्या हाताची खुर्ची अन पाय भंगलेले टेबल 
कुठल्यातरी मास्तराच्या प्रतीक्षेत........ 
धुळीच्या रंगाचे, मोडीत निघाल्यासारखे 
चार-पाच बाक
पाटी-दप्तराच्या  स्पर्शाला आसुसलेले......... 
कुठल्यातरी कोनाड्यात 
'विद्या विनयेन शोभते' ची सुविचारात न्हालेली फळी 
शालेय कोलाहलाची पुटे गिळून,चोहोबाजूंनी चालून आलेली  
आक्रमक विषण्णता 
निष्क्रिय, सुस्तावलेल्या अजगरासारखा 
लोंबकाळणारा घंटेचा टोल
शाळेबाहेरील मातीत  
अस्पष्ट होत गेलेले पायांचे ठसे 
केस विस्कटून पिंजारावेत तशा 
शाळेच्या कौलांना झोंबणाऱ्या वृक्षांच्या बेशिस्त फांद्या 
दाढीचे खुंट वाढावेत तशी 
जागोजागी शेवाळलेली शाळेची रोगट वास्तू
आजूबाजूच्या हिरव्यागार, शोभिवंत निसर्गाशी 
बेईमानी करणारी
आता कावळे-कुत्रे तेथील अनभिषिक्त सम्राट 
शाळेच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून 
फडफडत एक कागद माझ्या पायाशी
निळ्या, सुबक अक्षरांना छातीवर झेलणारा 
'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा'
या गीतावर उपहासणारा ..................  




Thursday 19 January 2012

डाव- कविता


हातात पत्ते घेऊन 
आपण खेळायला बसतो
किलवर, इस्पिक, चौकट, बदाम
चार रंगांच्या पानांची भेसळ
सगळ्यात हलकी पाने आपल्या वाट्याला
समोरील भिडूच्या पानांतले गुपित
आपल्याला भेडसावू लागते
त्याची पाने काय असतील?
त्याचे रंग कोणते असतील?
ती जड असतील की हलकी?
तो हसल्यासारखं वाटतो
त्याच्या हातातील पानांच्या आधारावर
त्याच्या नजरेने आपण खिजवले जातो
डाव सुरु होतो..........
आपल्या गुलामावर त्याची राणी कुरघोडी करते
आपली एकुलत्या एका राजाचा जीव त्याचा हुकमी एक्का घेतो
आता उरलेली पाने असून नसल्यासारखीच
आपल्या प्रत्येक रंगाच्या पानावर त्याचे रंग धावून येतात
आपल्या प्रत्येक पानावरील त्याचे वर्चस्व 
जणू काही आधीच लिहिलेले असते
आपण गळाठल्या नजरेने त्याचं ते 
भीषण, रौद्र खेळणं पाहू लागतो
त्याच्या खेळातील मातब्बरीपुढे 
आपला उडालेला असतो धुव्वा 
आता हरण्याला पर्याय नसतो
वाट पहायची असते फक्त
शेवटचे पान पडण्याची! 

Wednesday 18 January 2012

वलयांकित पाककला

पूर्वी पाकशास्त्र या क्षेत्राभोवती एक वलय नव्हतं. एकतर आहार शिजवण्याची मक्तेदारी घरांतील बायकांकडे होती किंवा लग्न समारंभात आचारी किंवा खानसामे ही भूमिका पार पाडायचे. मोठ्ठाल्या कढया, घमेली शेगड्यांवर चढवली जायची आणि हे पोट सुटलेले, घामेजलेले कळकट्ट आचारी त्यावर अन्न शिजवायचे. घरातील बायकाही नऊवारी लुगडे नेसून स्वयंपाकघरात कामाला जुंपलेल्या असायच्या. एखादी आलवणातली आत्या किंवा मावशी पाककलेची बाराखडी या नव्या मुली-सुनांकडून गिरवून घ्यायची. सर्वसाधारण बहुतांश घरातील हे चित्र होतं. 
कालप्रवाहाप्रमाणे हळूहळू चित्र बदलत गेलं. घरदार सोडून स्त्री जशी नोकरी करू लागली तशी स्वयंपाकीणबाईंची घराघरात एन्ट्री झाली. एक नवीन व्यवसाय उभारी धरू लागला. पोळी-भाजी करणारी बाई, पूर्ण स्वयंपाक करणारी बाई, वरची चीराचिरीची कामे करणारी बाई, धुणी-भांडी करून घरातील स्त्रीला मदत करणारी बाई म्हणून स्वयंपाकीणीची वर्णी लागू लागली. आज मात्र बायकांसमोर काम करणाऱ्या बाईव्यतिरिक्तही दुसरे पर्याय आहेत. ठिकठिकाणी पोळी भाजी केंद्रे उघडली आहेत. ऑफिसमधून येणाऱ्या बऱ्याच बायका संध्याकाळच्या जेवणाची सोय इथून बघतात. एकट्या राहणाऱ्या अनेक पुरुषांचीही या पोळी-भाजी केंद्रांनी चांगली सोय केली आहे. 
आज 'आचारी ते शेफ' असा कालानुरूप बदल झाला आहे. पाककलेतील सौंदर्याची प्रचीती टी. व्ही.च्या माध्यमातून जगाला आली आहे. 'रांधा वाढा उष्टी काढा' ही मानसिकता हळूहळू हा होईना कात टाकते आहे. आधुनिक उपकरणे हाताशी धरून स्त्रीने स्वयंपाकघराला एक सोफिस्टीकेटेड टच दिला आहे. जुनी तांब्या-पितळेची भांडी जाऊन त्याजागी नॉन-स्टिक भांडी, मायक्रोवेव्ह सेफ भांडी आली आहेत. शहरातील बहुतेक कुटुंबे ही 'न्युक्लीअर' असल्याने आपापल्या आवडीनुसार पदार्थ करण्याचे स्वातंत्य्र स्त्रीला अनुभवता येते आहे.  
सुहास्यवदन संजीव कपूरने पाककलेला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. त्याच्या 'खाना-खजाना' या कार्यक्रमाने पाककलेच्या क्षेत्रात क्रांती आणली आणि ह्या निमित्ताने अनेकांना आपल्या पाककलेचे कसब जगासमोर दाखवायला सुसंधी मिळाली. वेगवेगळ्या पाक-स्पर्धांमध्ये घराघरांतील स्त्रिया हिरीरीने भाग घेऊ लागल्या आहेत. आज निरनिराळ्या प्रांतातील पदार्थ पाककलेत निपुण असलेल्या लोकांकडून पाहता येतात, घरबसल्या शिकता येतात. चार भिंतीत बंदिस्त असलेली, स्त्रियांना कोणतीही प्रतिष्ठा बहाल न करणारी पाककला आता लोकप्रिय झाली आहे इतकेच नव्हे तर या माध्यमातून साधारण वाटणाऱ्या स्त्रीला ही कला लोकाभिमुख, समाजाभिमुख करते आहे. वर्षानुवर्षे स्वयंपाकघरात घाम गाळून, राबराबून स्त्रीला दुय्यम स्थान मिळायचे किंवा तिची उपेक्षा व्हायची. कारण मुळातच स्वयंपाक करणे हे स्त्री जन्माच्या पाचवीला पुजलेले होते. 'चूल आणि मुल' या कचाट्यातून स्त्रीची सुटका नव्हती. पण काळ बदलला आणि स्त्रीच्या कर्तुत्वाच्या कक्षा रुंदावल्या. घराच्या जबाबदारी प्रमाणे ऑफिसचीही जबाबदारी स्त्री समर्थपणे सांभाळू लागली. तिच्या  जाणीवा,तिची मुल्ये अधिक व्यापक झाली.  
आज ठिकठिकाणी 'खाद्यमहोत्सव' साजरे केले जातात. आपल्या प्रांताचे वैशिष्ट्य असलेले पदार्थ तयार करून खवैय्यांची माने जिंकता येतात. स्त्रियांप्रमाणे अनेक पुरुषही या क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यास उत्सुक असतात कारण आज या व्यवसायाला एक प्रतिष्ठा लाभलेली आहे. आधुनिक वस्त्र-प्रावरणात, अत्याधुनिक किचनमध्ये पदार्थांचे नव-नवे प्रयोग  करताना एक वेगळाच आनंद होतो. पदार्थांची आकर्षक मांडणी, तयार पदार्थावरचे गार्निशिंग खवैय्यांच्या डोळ्यांनाही तृप्त करून जाते. आपला आहार कसा असावा व कसा असू नये यासंबंधी वेगवेगळे आहारतज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतच असतात.      
जुने ते सोने ही व्याख्या थोडीशी बदलून मी असं  म्हणेन की जुने ते सगळेच सोने नसते. काही जुन्या पद्धती अजूनही टिकून आहेत . पण पारंपारिकतेच्या नावाखाली फक्त जुनाट गोष्टी गोंजारीत राहायच्या आणि नव्या गोष्टींची निंदा करायची यात तरी काय तथ्य आहे? जुन्या चांगल्या चालीरीती,पद्धती जरूर अंगीकाराव्यात पण नव्या सुविधांना, सोयींना कमी लेखू नये. काळाप्रमाणे माणूस बदलला पाहिजे, अधिकाधिक संमृद्ध झाला पाहिजे, त्याच्या जाणीवा विस्तारल्या पाहिजेत, त्याची दृष्टी अधिक व्यापक झाली पाहिजे. वर्षानुवर्षे कवटाळून बसलेल्या किचकट,वेळखाऊ आहारपद्धती बदलून आता सोप्या आणि अल्पावधीत तयार होणाऱ्या पण चांगली पोषणमुल्ये असणाऱ्या आहारपद्धती आपण स्वीकारल्या पाहिजेत.   

'रांधा वाढा आणि उष्टी काढा' हे आजच्या स्त्रीचं स्थान नसून ती स्वत:च्या घरातील 'सु-शेफ' आणि 'आहारतज्ञ' आहे.   



Monday 16 January 2012

शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत - एक उहापोह

संगीत म्हणजे शुद्ध-कोमल-तीव्र अशा बारा स्वरांत खेळला जाणारा लडिवाळ खेळ. गवताच्या पात्यांवर पडणाऱ्या दवबिंदुंचा ताजेपणा संगीतात आहे. वाऱ्याच्या शीतल झुळूकीइतकेच  संगीतही आल्हाददायी आहे. देवघरातील प्रसन्नता,पवित्य्र,मांगल्य संगीतात आहे. अमृताचा कैफही संगीतात आहे. परमात्म्याप्रत नेण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. अशा या संगीताचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत- एक शास्त्रीय संगीत आणि दुसरे सुगम संगीत.    

शास्त्रीय संगीत ही स्वरप्रधान गायकी तर सुगम संगीत ही शब्दप्रधान गायकी असे समजले जाते. शास्त्रीय संगीतात ख्याल-गायन,द्रुपद-धमार-दादरा, टप्पा-ठुमरी, नाट्यसंगीत हे गानप्रकार मोडतात तर सुगम संगीतात भावगीत, भक्तीगीत, गझल,लावणी,कव्वाली असे गानप्रकार मोडतात. 
आलाप, विलंबित ख्याल,छोटा ख्याल, तराणा, ताना-बोलताना यांच्या माध्यमातून राग प्रकट करणे ही शास्त्रीय संगीताची खासियत तर शब्द आणि भावना यांचे सुरावटीच्या माध्यमातून प्रकटीकरण करणे ही सुगम संगीताची खासियत! 
शास्त्रीय संगीतातील ख्यालाची बांधणी ही त्यांतील घराण्यांवर अवलंबून असते तर सुगम संगीत हे संगीत दिग्दर्शकाने योजलेल्या वाटेवर चालते. ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीतात जयपूर-अन्त्रोली, मेवाती, रामपूर-सास्वान, ग्वाल्हेर, आग्रा, किराणा ही घराणी आहेत त्याचप्रमाणे सुगम संगीतातही वसंत प्रभू, हृदयनाथ मंगेशकर,सुधीर फडके, नौशाद,एस.डी.बर्मन, सलीलदा , मदनमोहन,सी.रामचंद्र, ओ.पी. नैय्यर अशांसारखी कैक घराणी आहेत. ज्याप्रमाणे प्रत्येक घराण्याची राग मांडण्याची शैली निराळी त्याचप्रमाणे प्रत्येक संगीत दिग्दर्शकाची गाणे स्वरबद्ध करण्याची पद्धत निराळी असते.              
तुम्ही दोन तास गा अथवा तीन मिनिटे गा , तुमच्या गाण्याने रसिकांची मने काबीज करणे महत्वाचे आहे. जास्त वेळ गाणे म्हणजे चांगले गाणे नव्हे. तुमच्या विचारांतील वैविध्य त्या त्या विशिष्ट रागामार्फत तुम्हाला अचूकपणे मांडता यायला हवे. नियमांच्या चौकटीत राहून तुम्हाला लालित्यपूर्ण रीतीने स्वरांच्या रेशमी लड्या उलगडता यायला हव्यात. अतिशयोक्ती नाही परंतु बरेच वेळा जो परिणाम तास-तास गाऊनही साध्य होत नाही तो परिणाम केवळ काही मिनिटांचे गाणे साध्य करून जाते. 
खूप वेळा मी स्वत: असे अनुभवले आहे की रागदारी गाणारे सुगम गाणारयाला तुलनेने कमी समजतात.  सांज लोकसत्तेत जेव्हा मी संगीत परीक्षण करत होते तेव्हा अशी या संदर्भातली अनेक मते मी ऐकली. गाणारयाचा  दर्जा, त्याची संगीतातील जाण, त्याची क्षमता ही तो कुठच्या प्रकारचे संगीत गातो आहे यावर अवलंबून नसते तर तो ते संगीत कशा पद्धतीने सादर करतो आहे  यावर अवलंबून असते. काही माणसे केवळ खोट्या अहंकारापोटी आम्ही फक्त शास्त्रीय संगीतच ऐकतो असे म्हणतात. माणसांनी काय ऐकावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तरीही एखाद्या विशिष्ट गानप्रकाराला हीन लेखणे ही माणसातील दर्जेदार श्रोत्याची हमी नसते.  ज्याप्रमाणे एखादा राग आवडतो किंवा नाही या कारणावरून त्या रागाचे महत्व उणावत नसते, त्याचप्रमाणे एखादे गाणे आपल्याला आवडते अथवा नाही यावरून ते गाणे कमी महत्वाचे ठरत नाही. ज्याप्रमाणे विशिष्ट राग किंवा गाणे आवडणे ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे त्याप्रमाणे  संगीतातील विशिष्ट गानप्रकार आवडणे ही सुद्धा सापेक्ष गोष्ट आहे.    
जसे ज्येष्ठ गायिका पं. किशोरीताई आमोणकर,पं.प्रभाताई अत्रे, पं.मालिनीताई राजूरकर, बालगंधर्व, कुमारगंधर्व, पं. जसराज, पं.अजय पोहनकर, पं.उल्हास कशाळकर यांसारख्या अनेकांनी प्रस्थापित केलेले, श्रोतृहृदयी रुजवलेले गाणे नि:संशय प्रशंसनीय आहे तसेच गानसम्राज्ञी लतादीदी,आशाताई भोसले.सुमनताई कल्याणपूर,बाबूजी,सुरेशजी वाडकर,रफीसाहेब,मन्नादा,किशोरकुमार यांनीही श्रोत्यांच्या हृदयात आपली गायकीने मिळवलेले चिरंतन स्थानही तितकेच महत्वाचे आहे.          
कुठल्या संगीताशी आपली नाळ आपण पक्की करायची हा ज्याचा त्याचा स्वभावधर्म  आहे पण संगीतातील इतर गानप्रकारांना कनिष्ठ लेखणे हा सुजाण श्रोत्याचा धर्म असता कामा नये. आज संगीताचे ऐश्वर्य ज्या कानांमुळे आपण उपभोगू शकतो त्या कानांच्या भिंती काही गानप्रकारांकरता आपण कसल्यातरी आकसापोटी मिटाव्यात हे उत्तम श्रोत्याचे लक्षण नव्हे. संगीतातून गाणारयाचे ऐकणारयाशी आणि ऐकणारयाचे गाणारयाशी नाते अधिकाधिक दृढ होत असते.  
श्रेष्ठता-कनिष्ठता या दृष्टीकोनातून संगीताचे प्रकार न तपासता जर आनंदानुभूतीच्या दृष्टीकोनातून पहिले तर शास्त्रीय आणि सुगम अशा भेदाचे कारण उरणार नाही.  
  

Sunday 15 January 2012

एक बाजू हरवलेले नाणे

आपण खरेच सुसंस्कृत आहोत काय? आपल्या संवेदना गोठल्या आहेत काय? आधुनिकतेची कास धरता धरता आपण माणुसकीची कास सोडली आहे काय? समानुभूती, सहानुभूती कधी आपल्या अंत:करणाला स्पर्शून जाते  काय? हे आणि अशांसारखे प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याची गरज आहे. 
काही महिन्यांपूर्वी मी रस्त्यावरून जात असताना घडलेली ही घटना आहे. एक आजोबा रस्त्यावर काठी घेऊन चालत होते. त्यांचा एक पायही बहुतेक अधू असावा. हातही थरथरत होते. तशात ते अचानक तोल जाऊन पडले. मी त्यांच्या समोरून येत होते. मी त्यांना लगेचच आधार देऊन उचलायचा प्रयत्न केला खरा पण मला त्यांना उचलता येईना. आजूबाजूचे लोक फक्त उघड्या डोळ्यांनी हे दृश्य बघत होते. शेजारी एक चहाची टपरी होती आणि एक मोच्याचे छोटे दुकान होते.शेवटी न राहवून मी ओरडले. अरे कुणीतरी या आजोबांना मदत करा प्लीज. मग बाजूचा टपरीवाला,मोची आणि इतर एक-दोन माणसे मदतीसाठी आली. आम्ही त्या आजोबांना उचलून चहाच्या टपरीपाशी नेले. त्यांना खूप लागलं आहे का ते विचारलं आणि काही मिनिटातच ते आजोबा कसेबसे उठून चालायला लागले. त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवावेसेही तेथील कुणाला वाटले नाही. त्यांच्या घरी त्यांची काळजी घेणारं कोण असेल? असेल का नाही? त्यांना घरापर्यंत तरी नीट जाता येईल काय? असे अनेक प्रश्न माझ्या मनात रेंगाळू लागले. त्यांनी आमच्याकडून मदतीची अपेक्षा केली नव्हती तरी सुद्धा माणुसकीच्या नात्याने आणि त्यांच्या वयाकडे बघून त्यांना घरापर्यंत कुणीतरी सोडायला हवे होते असे सारखे वाटत राहिले. 
जसजसा आर्थिक,बौद्धिक विकास होतो आहे तसतसे माणसातील सामाजिक भान लोपू पाहत आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गंभीर घटनांकडेही माणूस हेतूपुरस्सर कानाडोळा करू पाहत आहे. कुणी दिवसाढवळ्या हातात चाकू-सुरे घेऊन दुसऱ्यावर वार करो, मुलींची-महिलांची छेडछाड करो किंवा त्यांच्याशी अतिप्रसंग करो आपली भूमिका सदैव बघ्याचीच असते. एकटादुकटा माणूस एखादेवेळी घाबरेल पण माणसांचा जमावही या गुन्हेगारांना धडा शिकवू शकत नाही काय? मध्यंतरी मुंबईच्या लोकलमध्येही एका अपंग मुलीवर रात्री अतिप्रसंग झाला होता. शेजारच्या डब्यात इतर माणसे असूनही ती फक्त हतबल होऊन पाहत राहिली. वास्तविक पाहता तो एकटा होता आणि इतर संख्येने जास्त होते. पण त्या असहाय मुलीला वाचवायची आत्यंतिक इच्छा म्हणा किंवा गरज म्हणा त्यातील कुणालाच वाटली नाही. त्या माणसाचा कार्यभाग साधला आणि इतर माणसांमधील षंढपणाचीही खातरजमा झाली. काही गावांमध्ये काही कारणास्तव महिलांना विवस्त्र करून झाडांना बांधले जाते पण त्यांना सोडवायला कोणी येत नाही. जो तो घडल्या प्रसंगाची मीठ-मिरची लावून चर्चा करतो पण त्याला याबद्दल बंड पुकारावेसे कोणाला वाटत नाही. चालत्या रेल्वेतून एक मुलगी खाली पडते. हाहा:कार माजतो. पण तिला वाचवण्याकरता प्रत्यक्ष कोणतीही कृती केली जात नाही. पोलीस योग्य वेळी येत नाहीत,पोलीस कामचुकार असतात, पोलीस लाचखाऊ असतात, पोलीस ऐन वेळेस गायब होतात  यांपैकी अनेक लांछने आपण पोलिसांना वेळोवेळी लावत असतो परंतु एका उत्तम नागरिकाचे कर्तव्य आपल्यापैकी कितीजण बजावतात? पोलिसांची कुमक येण्याआधीची मदत ही नेहमीच तिथे त्यावेळी उपस्थित असलेल्या माणसांचीच असते. मग मदतीची ही संधी मिळून सुद्धा आपल्यापैकी कितीजण ह्या संधीचा लाभ घेण्यास पुढे सरसावतात? 
जातीय दंगली माजवणारे,एखाद्या पक्षाच्या झेंड्याखाली राहून राडे करणारे, दुकाने फोडणारे, आगी लावणारे, पोस्टर्स जाळणारे, मोठमोठ्याने पक्षाचा उदोउदो करणारे अशा ऐन मोक्याच्या वेळी कुठे लुप्त होतात? जमावाचं राजकारण खेळणारे या जमावाच्या साहाय्याने या राजरोस घडणाऱ्या गुन्ह्यांचे बालेकिल्ले,त्यांचे सूत्रधार यांना का नेस्तनाबूत करत नाहीत?  मुलींची छेडछाड करणारे,महिलांवर अतिप्रसंग करणारे,हत्यारांनी निरपराध्याचा जीव घेणारे अपराधी यांना सोयीस्कररित्या दिसत नाहीत काय?  
मध्यंतरी दुपारच्या निवांत वेळी एक वृद्ध महिला तिच्या इमारतीचा जिना चढताना जिन्यात लपून आणि टपून बसलेल्या एका  चोरट्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले आणि तिचा कोणताही प्रतिकार व्हायला नको म्हणून तिला जोराने जिन्यावरून खाली ढकलले. तिच्या डोक्याला गंभीर जखम होऊन टाके पडले. एक तर त्याने चोरी केली ती केली आणि तिच्या वयाचा मुलाहिजाही न बाळगता तिला कठोरपणे जिन्यावरून ढकलून दिले. लोकलमध्येही रोज चढता उतरताना जी जीवघेणी स्पर्धा चाललेली असते ती बघून अंगावर काटा उभा राहतो. वृद्ध महिला, गरोदर स्त्रिया, लहान मुले, आजारी माणसे, अपंग माणसे यांनाही वाट्टेल तसे धक्के मारून जागा बळकावण्याचा काही स्त्रियांचा, काही पुरुषांचा आटापिटा पहिला की त्यांच्या आपमतलबी,स्वार्थी वृत्तीची घृणा वाटते. जणू माणुसकीशी आपले दुरदूरचेही नाते नाही असे ठसवणारी  यांची कृत्ये असतात. 
 दुसऱ्याच्या प्रेयसीवर नजर ठेवल्याने चिडून त्याने त्याला या कृत्याबाबतचा जाब  विचारताच त्याचा फाजील अहंकार दुखावल्यामुळे तो त्याच्या चार मित्रांना तिथे घेऊन येतो आणि त्याचा कोथळा बाहेर येईस्तोवर त्याला मारहाण करतो. आपल्यातील माणसाचे आणि माणुसकीचे हे केवढे घृणास्पद हनन? 
आताशा चांगल्या घरांतील माणसेही ही लज्जास्पद कृत्ये सर्रास करत असतात. बऱ्याच घरांतील मोलकरणी या अशा निलाजाऱ्या लोकांची 'टार्गेट्स' असतात. आपली सहृदयता,आपली माणुसकी गहाण ठेवून अशी कृत्ये करणारी माणसे पहिली की विलक्षण चीड येते. अशा माणसांपेक्षा पशूच केव्हाही चांगले. भूक शमल्यानंतर पुढ्यात आलेल्या शिकारीकडे ढुंकूनही  न बघणारे जनावर कुठे आणि आपली भूक ही मुळी न शमण्याचीच गोष्ट आहे असे समजून अनेकांवर अनन्वित अत्याचार करणारे हे माणसांमधले लांडगे कुठे? 

घरी बायको-मुलांना शिवीगाळ-मारहाण करणारे, ऑफिसमधील सहकाऱ्यांचा सतत अर्वाच्च्य शब्दांनी पाणउतारा करणारे,वृद्धांचा अवमान करणारे, व्यवहारी वृत्तीपायी लोकांच्या मनातील भावनांचं निर्माल्य करणारे फक्त शिक्षित असतात पण सुसंस्कृत कधीच नसतात. 
शिकून आपण फक्त साक्षर होतो, सुशिक्षित होतो पण सुसंस्कृतपणाचे बाळकडू पाजणाऱ्या शाळा कुठेही नसतात. आपण या देशाचे एक जबाबदार,सुजाण नागरिक आहोत असे आपल्याला वाटत असते. पण आपल्या भोवती एखादी घटना घडते,आपण इतर अनेकांप्रमाणे फक्त बघ्याची भूमिका घेतो आणि आपल्यातील माणुसकीचा, सुसंस्कृततेचा फुगा फुटतो. 
सुशिक्षितता आणि सुसंस्कृतता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोहोंच्या सरमिसळीतून माणसातील माणूसपणा दृग्गोचर होत असतो. सुसंस्कृतातेविना माणूस म्हणजे एक बाजू हरवलेलं नाणं! जे फक्त दिसतं पण चालत नाही. 

Saturday 14 January 2012

तिळगुळ घ्या कधीतरी गोड बोला ......

गोड बोलल्यावर लगेच डायबेटीस होत नाही तसेच डायबेटीस ऑलरेडी असेल तरी गोड खायला बंदी असते बोलायला नाही हे ठाऊक असूनही माणसे गोड बोलायला कचरतात. कदाचित म्हणूनच तिळगुळ खाल्ल्यावर तरी माणसांनी माफक गोड बोलायला हवे. संक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा होत असतो तेव्हा या कालावधीत तरी गोड बोलून बघायला हरकत नाही. विशेषत: मराठी माणसांनी!

काही माणसे जिभेवर कारले घेऊनच जन्मत असावीत. त्यामुळे सतत कडवट बोलणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच असावा. काडेचिराइताचा काढा प्यायल्यासारखे यांचे सदैव लांबट तोंड बघून कुणा चतुर माणसाला 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' हा सुविचार सुचला असला पाहिजे. पण वास्तविक पाहता संक्रांतीचा सण हा फक्त जानेवारी महिन्यात येतो. एवढा एकच महिना फक्त गोड बोलायचे? गुढीपाडव्याच्या दिवशी आपण 'श्रीखंड खा गोड गोड बोला' किंवा होळीच्या दिवशी आपण 'पुरणपोळी घ्या गोड गोड बोला' असे का नाही म्हणत? आपण आपल्या उण्यापुऱ्या आयुष्यात जितके गोड खातो त्याच्या शतांशाने तरी गोड बोलतो का ? 
काही माणसांना काही गोड बोलण्याची,बघण्याची मुळी allergy च असते. काही चित्रपटांतून बघा सारखं एखाद्याचं चांगलंच झालेलं दाखवतात. तेथील घरात सगळी माणसे जिभेवर साखर ठेऊनच बोलत असतात. प्रेम,प्रेम आणि प्रेम याशिवाय त्यांच्या आयुष्यात काहीच नसतं. कसं काय शक्य आहे? असे प्रसंग पाहताना ही माणसे मर्तिकाला बसल्यासारखी बसतात. इतकं गोड बघताना त्यांना अजीर्ण झाल्यासारखं वाटतं. सुरज बडजात्याने तरी इतकं सगळं आनंदी,गोड का दाखवावं? थोडं तारतम्य बाळगायला नको का? त्यावेळी हे जेवत असतील तर यांना हमखास ठसका लागतो. ही माणसे एकवेळ प्रकृती नीट राहावी म्हणून 'लाफ्टर क्लब' जॉईन करतील पण घरी जरा हसतील, गोड बोलतील तर शपथ! यांना निर्माण करताना परमेश्वर हास्यरस नामक भाव यांच्यात 'फिट' करायला विसरला असावा. 
कुठल्याही गोष्टीचा आनंद घेणे म्हणजे नेमके काय हे यांच्या गावीही नसते. घरात कुणाचा वाढदिवस असेल हसायचे नाही, लग्नाला जायचे पण हसायचे नाही, चांगला कार्यक्रम बघितला हसायचे नाही, दुसऱ्याला शुभेच्छा देतानाही असे बोलायचे की आत्ताच कुणाला पोहोचवून आले आहेत. किती छान आहे तुझा ड्रेस किंवा किती छान गातेस तू किंवा किती छान मार्क मिळवलेस तू असं आणि इतकं गोड बोलतानाही यांच्या जीवावर येतं. मुळातच गोड बोलायचं का हा प्रश्न त्यांना मनोमन सतावत असावा. त्यामुळे फार गोड बोलणारी माणसे ( ही तशी दुर्मिळच असतात) यांच्या 'गुड बुक्स' मध्ये कधीच नसतात. 
कुणाची प्रशंसा करणं म्हणजे गोड बोलावं लागणार या नुसत्या विचारानेच ही माणसे कासावीस होतात. आता राजकारणी लोक बोलतात तसं आणि तेवढं गोड नाही बोललात तरी चालेल कारण त्यांचे मनसुबे निराळे असतात, त्यांची धोरणे निराळी असतात. निवडणुका जवळ येताच त्यांना प्रथम कोणती गोष्ट करावी लागते ती म्हणजे गोड गोड बोलून लोकांना आपलेसे करणे. इतकी वर्षे रखडलेली कामे पटापट हातावेगळी करून लोकांच्या मनात स्वत:चे स्थान बळकट करणे, चेहरा भलताच गोड,प्रसन्न ठेऊन आश्वासने देणे या कसरती त्यांना गोड बोलूनच साद्ध्य कराव्या लागतात. 
गोड खाण्यास हपापलेली माणसे गोड बोलण्यास आसुसलेली नसतात. आपल्या गोड बोलण्याने आपला तसाच दुसऱ्याचाही दिवस चांगला जाईल हा विचार यांना मान्य नसतो. सकाळी ऑफिसला जाताना किंवा संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर दोन शब्द का होईना गोड बोलावे आणि घरातील वातावरण प्रफुल्लीत,आनंददायी करावे हे यांना पटतच नाही. पण कुणाच्या वर्मावर बोट ठेवायचं असेल,कुणाचा पाणउतारा करायचा असेल किंवा कुणाविषयी कुत्सित बोलायचं असेल तर यांचा नंबर पहिला असतो. किंबहुना अशा वेळेस सगळे वांग्मयकार यांना वश झालेले असतात. 
खरे म्हणजे चांगल्या पद्धतीने सरळ,साधे,सोपे बोलणे म्हणजे गोड बोलणे. दुसऱ्याला आवडेल असे बोलणे म्हणजे गोड बोलणे, प्रियजनांना न दुखावता बोलणे म्हणजे गोड बोलणे. आणि असे गोड बोलायला खरंच कोणतेही कष्ट पडत नाहीत फक्त गोड बोलायची इच्छा मात्र हवी. पण गोड बोलण्याची किमान एवढीही पातळी गाठू न शकणाऱ्या लोकांकडे बघून असे म्हणावेसे वाटते की खरेच सर्वात सोपी गोष्ट करणे हीच सर्वात मोठी कठीण गोष्ट आहे. 
तेव्हा कधीच गोड न बोलू पाहणाऱ्या माझ्या बांधवांनो, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तरी कधीतरी गोड बोलून बघा. तुमच्या आणि तुमच्या जवळच्यांचा आनंदाचा पतंग गगनात कसा भरारी मारतो ते !


Friday 13 January 2012

वास्तवाशी विसंगत ........

नुकत्याच संपलेल्या 'गुंतता हृदय हे' ही मालिका बघितल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले. आपल्या बायकोने किंवा आपल्या नवऱ्याने आपल्या विवाहबाह्य संबंधांचा गौप्यस्फोट करावा म्हणून हा सबंध घाट घातला गेला होता हे पाहून खूप आश्चर्य वाटले. वास्तविक पाहता आजकालच्या नवरा-बायकोचे संबंध अधिक मोकळे आहेत. पूर्वी नवरा म्हणेल ते ऐकण्याशिवाय स्त्रीला गत्यंतर नसे. एकतर स्त्री ही जास्त शिकलेली नसे किंवा तिला शिकू दिले जात नसे. तिचं संपूर्ण विश्व घरातील चार भिंतींमध्ये सामावलेलं असायचं. नवऱ्यासाठी,घरातील वडीलधारयांसाठी आणि मुलाबाळांसाठी खस्ता खाणं हा तिच्या नशिबाचाच भाग होता. पण आता तशी परिस्थिती नाही. स्त्रिया व्यवस्थित शिकतात आणि स्वत:च्या पायांवर सक्षमपणे उभ्या राहतात. नवरा आणि बायको एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण करतात. स्वत:ची व्यावसायिक सुखदु:खे शेअर करतात. पुरुषांप्रमाणेच आजकालच्या स्त्रिया स्वत:ची मते ठामपणे मांडू शकतात. मग अशा एखाद्या स्त्रीला नवऱ्याच्या वर्तनाबद्दल संशय आला असेल तर ती स्त्री त्याला तसं स्पष्टपणे विचारू शकत नाही का? हीच गोष्ट पुरुषाच्या बाबतीतही म्हणता येईल.  
हा नात्यांमधला गुंता सोडवण्यासाठी, आपल्याच व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आणण्यासाठी इतर नातेसंबंधांना धारेवर धरणे आणि आपल्या हातातील अमुल्य वेळ पुढील डावपेच आखण्यात खर्च करणे यात या माणसांनी काय साध्य केले? रात्री-अपरात्री घराच्या बेला वाजविणे,चिठ्ठ्या-चपाट्या लिहून दुसऱ्याला नामोहरम करणे,घरातील पैसे गायब करणे  हे खेळ बालिश आणि अपरिपक्व वाटतात. हे सगळे पाहून असे वाटत होते की कोणीतरी विक्रम आणि नयनाचे वाईट करू पाहत आहे. त्यांच्या मुलीला पळवल्यानंतर तर या समजुतीवर शिक्कामोर्तब झाले. पण हाय! या सगळ्या कट-कारस्थानात नयनाही सहभागी होती. अशा तऱ्हेने आपण नवऱ्याकडून त्याचा कबुलीजबाब घेऊ शकू असे तिला वाटत होते. विक्रमला तर नयना बायको म्हणून हवी होती आणि अनन्याही गर्ल फ्रेंड म्हणून हवी होती. तो हे संबंध टिकवण्यासाठी सराईतपणे खोटे बोलत होता एवढेच नाही तर नयनाच्या मैत्रिणीचा विस्कटू पाहणारा संसार सांधण्यासाठी तो प्रयत्नशील होता. आपण आपल्यावर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या बायकोची अशी रोज फसवणूक करत आहोत अशी साधी जाणीवही त्याच्या मनाला स्पर्शून जात नव्हती. पश्चात्ताप नावाचा शब्द त्याच्या शब्दकोशातून गहाळ झाला होता. देवीवर म्हणजेच त्याच्या मुलीवर त्याचे निरतिशय प्रेम होते आणि तिच्याबाबतीत अनन्याचे गैर वागणे तो खपवून घेत नव्हता. त्याला संसारिक आणि सामाजिक प्रतिष्ठाही प्रिय असल्याने आपले विवाहबाह्य संबंध तो खुबीने झाकू पाहत होता. 

इकडे अभय त्याची शिपवरील चालू नोकरी तशीच सोडून अथवा तात्पुरती रजा घेऊन इथे आला. एकाच उद्दिष्टाने त्याला झपाटले होते. विक्रमला नेस्तनाबूत करणे. बायको अनन्यालाही तो वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होता, घाबरवत होता, तिचे मनोबल खच्ची करू पाहत होता. हा सगळा द्राविडी प्राणायाम बघितल्यानंतर असे वाटते की खरंच इतका मोकळा वेळ या माणसांकडे होता? वास्तवात असतो का? केवळ सत्य वदवून घेण्यासाठी हा इतका निष्कारण खटाटोप? आणि चोरी उघडकीला आल्यानंतर मात्र  नयना आपला संसार विस्कटू नये म्हणून किंवा देवीच्या नजरेत तिचा 'dadaa' उतरू नये म्हणून किंवा आई-वडिलांनाही विक्रमचे खरे स्वरूप कळू नये म्हणून त्याला चक्क उदार मनाने क्षमा करते. अरे मग जर क्षमाच करायची होती तर तो इतका सैरभैर होईपर्यंत,मानसिकदृष्ट्या कोलमडून जाईपर्यंत ताणायची काय गरज होती? अनन्याही अभयला खरे सांगू शकली नाही. आंधळ्या सासऱ्याला फसवत राहिली. तिच्या मैत्रिणीच्या उपदेशाचा तिच्यावर परिणाम झाला नाही. पण याचाही शेवट नवऱ्याने तिला माफ करण्यात झाला. नयनाने मात्र तिला माफ न केल्याची खंत तिच्या मनात कायम राहिली. 
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवरा-बायकोकडून जरी अशी चूक घडली तरी सत्य उघडकीला आणण्यासाठी कुणी आपल्या प्रापंचिक,व्यावसायिक जबाबदाऱ्या बाजूला ठेऊन त्यांना नामोहरम करण्याच्या इतक्या वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढेल असं खरंच वाटत नाही. एकतर एकमेकांशी बोलून हा तिढा सुटेल, एकमेकांवर जर प्रेम असेल तर संसार तुटणार नाही अन्यथा चालू संसाराची सांगता होऊन त्याचे पर्यवसान घटस्फोटात होईल.
मुळात आपल्या बायकोवर इतके अतोनात प्रेम करणारा पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे कसा आकर्षित होईल आणि समजा झालाच तरीही अनेक दिवस,अनेक महिने,अनेक वर्षे आपल्या बायकोशी आपण प्रतारणा करतो आहोत याची जाणीव त्याला झाल्यावरही उपरती होणार नाही का? आणि उपरती नाही,पश्चात्ताप नाही,गैरवर्तनाबद्दल मनात जराही गिल्ट नाही तर मग अशा नवऱ्याला कोणतीही बायको माफ का करेल किंबहुना असं नवरा क्षमा करण्याच्या लायकीचा असेल का? 
हल्लीच्या बऱ्याच मालिका नाट्यमयतेच्या नावाखाली वास्तवाशी विसंगत होत चालल्या आहेत. 
(या मालिकेचे शीर्षकगीत आवडले तसेच सर्व कलाकारांची कामेही फारच छान होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.)

Thursday 12 January 2012

प्रिय विद्यास,


ज्या विद्या बालन नावाच्या वादळाने सो कॉल्ड चंदेरी झाडांना मुळापासून गदगदा हलविले, ज्या विद्यामुळे हा अख्खा समुद्र माझाच आहे या भ्रमात राहू पाहणाऱ्या जहाजांच्या नाकातोंडात पाणी गेले त्या विद्यास .....
तुझा 'परिणीता ते डर्टी' हा प्रवास तर रंजक आहेच परंतु तुझा परीणीतेपर्यंतचा प्रवास हा जास्त विचार करायला लावणारा आहे. अभिनयाचा स्त्रोत घरी नसताना, कोणा मोठ्याचा वरदहस्त नसताना तू स्वत:ला तुझ्या ईप्सितापर्यंत पोहोचवण्यात जो खडतर प्रवास केलास तो खचितच अभिनंदनीय आहे. एका मध्यमवर्गीय तमिळ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेली मुलगी वयाच्या सातव्या -आठव्या वर्षी बालसुलभ खेळात रमायचे सोडून अभिनेत्री होण्याची इर्षा मनाशी बाळगते हीच गोष्ट मुळात आश्चर्यकारक वाटते. 
एकीकडे तू  जाहिराती तसेच छोटे छोटे म्युझिक आल्बम्स करत होतीस पण तुझ्यासमोरचे ध्येय मोठे होते. तू तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जिवाचे रान करत होतीस. काही प्रादेशिक फिल्म्स तू साईन केल्यास. मोहनलाल या वकुबाने मोठ्या असलेल्या नटाबरोबर काम करायला मिळणार म्हणून तू उत्सुक होतीस परंतु त्या फिल्मचे रीळ इतरांच्या वादात पुढे सरकलेच नाही. इतर अनेक फिल्म्समधूनही तुला पायउतार व्हावे लागले. तुझ्यावर अशुभतेचा शिक्का बसला. श्रीगणेशा होण्याआधीच तुला या प्रोजेक्ट्समधून एक्झिट घ्यावी लागली. तू ढेपाळून गेलीस. तुझी स्वप्ने तुला भंगल्यासारखी वाटली. तू अतिशय वाईट दिसतेस अशी तुझी या क्षेत्रातील काही जणांनी निंदा केल्यामुळे तुला जबर धक्का बसला. तू स्वत:ला आरशात बघण्याचेही टाळू लागलीस. तू एम ए विथ सोशोलोजी असूनही तुला तुझ्या भंगलेल्या स्वप्नांची कास सोडायची नव्हती. तू एकदा निराशेच्या गर्तेत  'Nariman point  ते  Bandra' अशी चालत आलीस. साईबाबांच्या मंदिरात जाऊन तू त्यांना साकडं घालण्या पलीकडे काहीच करू शकत नव्हतीस. अशा विमनस्क अवस्थेत तीन वर्षे गेल्यानंतर एक आशेचा किरण तुझ्या स्वप्नांच्या क्षितिजावर अंधुक दिसू लागला. 
प्रदीप सरकार उर्फ दादांकडे तू प्रोजेक्ट करत होतीस. त्यांच्याच सांगण्यावरून तुझं नाव विनोद चोप्रांच्या दरबारी रुजू झालं. तुझ्या ओडीशन्स सुरु झाल्या. सहा महिने तू हे महाकंटाळवाणं काम करत राहिलीस. अखेरीस तुला तुझ्या योजलेल्या प्रवासातील पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा क्षण आला. तू विनोद चोप्रांची 'परिणीता' झालीस. लाखो लोकांच्या मनात तुझी शेलाट्या अंगकाठीची,धारदार नाकाची छबी जाऊन बसली. त्यानंतर तू मुन्नाभाई, एकलव्य, गुरु, किस्मत कनेक्शन, हे बेबी, या चित्रपटांतून स्वत:ला आजमावत राहिलीस. चित्रपटांतील शहेन्शहाची 'पा' मध्ये आई झालीस, ईश्कीया मध्ये शिवराळ बोललीस. तुझ्या अभिनयात निश्चितच स्पार्क होता,तू बुद्धिनिष्ठ अभिनय करत होतीस तरीही तुझ्यातील काहीतरी लोकांना खटकत राहिलं.मध्यंतरीच्या काळात तुझा 'fashion disaster' असाही लौकिक झाला होता. 'अर्थ' चित्रपटातील शबाना-स्मिताच्या अभिनयाने तू भारली होतीस. तुझा अभिनय तसाच सकस,सर्वांगीण व्हावा यासाठी तू झटत होतीस. 'नो वन किल्ड जेसिका' या चित्रपटात तू एक सबमिसिव्ह आणि दुय्यम पात्र साकार केलंस जे तुझ्यासाठी कठीण होतं आणि आव्हानात्मक होतं. तुझा 'स्टारडम' धोक्यात येऊ शकला असता. पण तू पर्वा केली नाहीस. वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यासाठी तू धडपडत होतीस.  
मध्यंतरी तुला प्रियदर्शनचा 'भूलभूल्लैया' मिळाला आणि त्यातील मंजुलिकेच्या भूमिकेचं तू सोनं केलंस. 'Dissociative Indentity Disorder' या आजाराने ग्रासलेली मंजुलिका तू उत्तम रीतीने अभिनित केलीस. अवनी आणि मंजुलिकेच्या अस्तित्वाचा झगडा तू डोळ्यांतील हावभाव, शरीरबोलीतून प्रभावीपणे व्यक्त केलास. तुझ्यातील खरी अभिनेत्री आता आकारास येत होती. 
मिलन लुथ्रिया या संवेदनशील दिग्दर्शकाने तुझ्याकडे 'डर्टी' मधील रोलसाठी विचारणा केली. तू नेहमीप्रमाणेच भरपूर वेळ घेतलास. या भूमिकेला आपण योग्य न्याय देऊ शकू का याबद्दल तू साशंक होतीस. यथावकाश तू हा प्रोजेक्ट स्वीकारलास  आणि लाखो-करोडो लोकांच्या मनावर तू साकारलेली 'सिल्क' स्वार झाली. 'कहानी' हा तुझा आगामी चित्रपट आहे. त्यात तू पतीच्या शोधास्तव कलकत्यात आलेल्या एका गरोदर बाईची भूमिका साकारली आहेस. या चित्रपटातील तुझा वावरही तितकाच उत्तम असेल याबद्दल शंका असायचं कारण नाही. 
तुझ्या आजवरील अनेक मुलाखतींमधून तुझ्या विचारांतील स्पष्टता कळली आणि भावली. चित्रपटांमध्ये व्यस्त असताना तू तुझी सामाजिक जाणीवही जपतेस ही गोष्ट मला उल्लेखनीय वाटली. 
या झगमगीत चंदेरी दुनियेत डेरेदाखल झालेल्या इतर कचकडी बाहुल्यांसारखी तू नाहीस. अभिनयाशी दुरान्वयानेही नाते नसणाऱ्या इतर सौंदर्यशालिनी आणि तू यांच्यात कायम एक दरी राहणार आहे. तुझ्याकडे,चिकाटी आहे,संयम आहे,भूमिका समजून घेण्याची आणि त्यातील अगदी सूक्ष्म बारकाव्यांसकट ती अभिनित करण्याची वृत्ती आहे. तुझ्या डर्टी चित्रपटातील अभिनयाने तू फक्त हिरोइन्सचीच  नव्हे तर हिरोंचीही आसने चांगलीच डगमगवली आहेस. असो. तुझ्या पुढील कारकिर्दीला माझ्या सदिच्छा! असाच विविधांगी आणि आशयघन अभिनय करून तू तुझ्या ईप्सितापर्यंत नक्की पोहोचशील याची मला खात्री आहे.  

Wednesday 11 January 2012

धूम्रपान - एक सार्वजनिक आजार

धूम्रपान करण्यासाठी लोक वेगवेगळी कारणे शोधत असतात. कधी ट्रेंड म्हणून तर कधी टेन्शनवर उतारा म्हणून,कधी मित्रांचा आग्रह म्हणून तर कधी सवयीचा गुलाम म्हणून! स्वत: धूम्रपान करून इतरांच्या भोवतालचे वातावरण प्रदूषित करणारे हे महाभाग संख्येने विपुल आहेत. कधीतरी उत्सुकतेपोटी एखादी सिगारेट ओढून बघणारे एकदम दिवसागणिक चाळीस चाळीस सिगारेटी सुद्धा सहजपणे ओढत असतात. त्यात चित्रपटातील त्यांचे सो कॉल्ड रोल मोडेल्स असे आदर्श प्रस्थापित करण्यात माहीर असतात. रफ आणि टफ कपडे,ट्रेंडी शूज घालायचे, दाढीची खुंटे वाढवायची,डोळ्यांवर गॉगल, ओठांत सिगारेट शिलगवायची म्हणजे मग या आपल्या रुपड्यावर फिदा होणाऱ्या छब्यांची नुसती लाईन लागते असा समज काही हिरो सतत करून देतंच असतात. 
धूम्रपान हे व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे हा मजकूर सिगारेटच्या पाकिटावर लिहूनही सिगारेट्स ओढणाऱ्यांची संख्या दिसामाशी वाढतेच आहे. पण जसे सिगारेट ओढणे हे प्रत्यक्ष त्या व्यक्तीसाठी धोकादायक असते तसेच ज्या व्यक्ती त्या माणसाच्या संपर्कात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे येतात त्यांच्यासाठीही तेवढेच धोकादायक असते. आपल्या कोणत्याही व्यसनामुळे दुसऱ्याच्या आरोग्याला इजा पोहोचवायचा आपल्याला काय नैतिक अधिकार आहे हा विचार ही मंडळी कधीच करताना दिसत नाहीत. आपण 'passive smoker' व्हायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकारही इतरांना असला पाहिजे आणि त्यांनी तो बजावला पाहिजे. मला एका गोष्टीची खरोखर मजा वाटते. काही ठिकाणी 'इथे धूम्रपान करण्यास मनाई आहे' किंवा 'no smoking zone' असे लिहिलेले असते. म्हणजे इतरत्र धूम्रपान केले तरी चालेल असाच याचा अर्थ होतो. सुरक्षेच्या कारणास्तव असे लिहावे लागते पण मग जे धूम्रपान करत नाहीत त्यांच्या सुरक्षेचं काय? सरकार सिगारेट ओढण्यामुळे किंवा तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या अपायांची सूचना पाकिटावरील संदेशातून देते पण सिगारेटवर मिळणाऱ्या करामुळे त्यावर बंदी आणू शकत नाही. त्यामुळे सिगारेट ओढून पुढील परिणामांना सामोरे जाणे ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब ठरते. इथे प्रश्न येतो तो धूम्रपान न करणाऱ्यांचा! बरं, तुम्ही कृपया धूम्रपान करू नका कारण आम्हाला त्याने अपाय होऊ शकतो असे एकतर आपल्याकडे सांगण्याची पद्धत नाही आणि असे सांगितले तर त्या माणसाची खिल्ली उडवली जाऊ शकते. रस्त्यावरून चालताना, बससाठी उभे असताना, रेल्वेसाठी तिष्ठत असताना,थिएटरमध्ये किंवा अगदी निसर्गरम्य वातावरणात सहलीसाठी गेलो असताना हा धूर आपल्या नाका-तोंडात जात असतो. आपली इच्छा असो वा नसो या धुराची वलये आपल्याही फुफुसांत बिनदिक्कत शिरू शकतात. 
मुळात ही जी माणसे सिगारेट ओढतात त्यांना मला विचारेवेसे वाटते की तुम्ही नाही ओढलीत सिगारेट तर तुमचे काय बरे नुकसान होणार आहे? सिगारेट ओढल्यानेच माणूस आजकालच्या भाषेत 'ट्रेंडी' किंवा 'इन' वाटायचे कारण काय? कोणत्याही ताण-तणावावर सिगारेट ( आणि मद्य ) हा जर एकाच रामबाण उपाय असेल तर मग डॉक्टर्स का या गोष्टी 'प्रिस्क्राईब' करत नाहीत? मानसोपचार तज्ञांकडे या गोष्टी का उपलब्ध होत नाहीत? यातील निकोटीन नामक द्रव्याने फुफुसांची कार्यक्षमता कमी होऊन पुढे यासंबंधीचे अनेक आजार संभवतात हे ठाऊक असूनही आपण हा आत्मघाती मार्ग हा पत्करतो? आपण एक कुटुंबप्रमुख आहोत, आपल्यावर अनेकांची नुसती जबाबदारी नाही तर तेवढीच मायाही आहे हे सत्य आपण विसरून जातो का? आपल्या सिगारेट ओढण्याने फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या सानिध्यात येणाऱ्या अनेकांना अपाय होऊ शकतो याचा आपण गांभीर्याने का विचार करू शकत नाही? 
इतरत्र सिगारेट ओढण्यासाठी जरी शासनाने बंदी केलेली नसली तरीही याचा अर्थ तुम्हाला इतरांनी धूम्रपान करण्याचे लायसेन्स दिले आहे असाही होत नाही. कुणीही रस्त्यावर यावं, भकाभका सिगारेट ओढून आपल्या आजूबाजूची हवा प्रदूषित करावी ,समोरून येणाऱ्यांवर धुराची वलये सोडून त्याला शारीरिक इजा पोहोचवावी हा हक्क तुम्हाला कुणीही दिलेला नाही. दिवाळीत वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या धुराविरुद्ध आवाज उठवले जातात पण रोजच्या रोज या धुराचे जे अतिक्रमण धूम्रपान न करणाऱ्यांवर होते आहे त्याविरुद्ध आवाज उठताना दिसत नाहीत? जन-जागृती मोहीम काढली जात नाही. नुसते पोस्टर्स लावून या फोफावणाऱ्या घातक सवयीचे निराकरण होणार नाही. हनुमानाने जशी लंका पेटवली तशीच या धुम्रपानाविरुद्धची आग जनमानसात भडकली पाहिजे. एखाद्या विरुद्ध निषेध नोंदवताना ज्याप्रमाणे त्याची पोस्टर्स किंवा त्याच्या प्रतिमा जाळण्यात येतात त्याप्रमाणे सिगारेट ओढणाऱ्यांच्या हातातील,खिशांतील सिगारेटच्या पाकिटांची होळी करता आली पाहिजे. हा उपाय कोणाला कदाचित जहाल वाटेल परंतु सिगारेट ओढणारयांकडून आजूबाजूस जे हलाहल दिवसेंदिवस पसरते आहे आणि त्यात अनेक धूम्रपान न करणाऱ्यांचे फुकाफुकी बळी जात आहेत त्यापेक्षा हा उपाय निश्चितच कमी जहाल आहे. 
आपल्या वैयक्तिक घातक सवयींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ द्यायचा की नाही हा विचार करणे हे प्रत्येक  नागरिकाचे कर्तव्य आहे आणि इतरांच्या आयुष्याला इजा न पोहोचवणे ही त्याची नैतिक जबाबदारी आहे. या गोष्टींचे भान न ठेवणाऱ्यास शासन करणे ही या देशातील सुज्ञ नागरिकांची सामुहिक जबाबदारी आहे.