Friday 30 September 2011

लग्नसराई


तसा लग्नाचा मौसम बारमाही असतो. रस्ता,लोकल,बस,रिक्षा अशा सगळ्या ठिकाणी नटून -थटून चाललेल्या रमण्या दिसतात. लग्नाचे छोटे-मोठे हॉल तीनशे पासष्ट दिवस बुक्ड असतात. इमारतींना बाहेरून केलेली रोषणाई, सजविलेल्या गाड्या , फटाक्यांच्या माळा अशा अनेक रूपांनी लग्न आपल्या समोर उभं ठाकत असतं. लग्न ठरतं आणि मग खरेद्यांना नुसता उत येतो. केळवणांचा घाट वधू-वराच्या कंठाशी अन्न येईस्तोवर घातला जातो. आधी तो साखरपुडा नावाचा लग्नाचा ट्रेलर होतो. मग प्रत्यक्ष लग्न हा चलतचित्रपट सुरु होतो. ब्युटी पार्लरे ओसंडून वाहू लागतात. जो तो केशभूषा-वेशभूषा या चिंतनात मग्न होतो. बुफेचा बहुढंगी मेनू ठरविला जातो. वधू-वरांची सिंहासने, त्यामागची सजावट, भटजी नावाची संस्था, वातानुकुलीत हॉल, हळदी-कुंकू-अत्तर-पेढे वाटणाऱ्या गौरांगिनी, थंड पेये, स्टार्टर्स वितरीत करणारे, खास पाहुण्यांच्या देखभालीसाठी काही खास माणसे असा सगळा जामानिमा असतो. 

अभूतपूर्व असा लग्नाचा दिवस उजाडतो. यजमानांचे घर नुसते रंगीबेरंगी पिशव्या आणि खोक्यांनी भरून गेलेले असते. एकेकाच्या आंघोळी आटोपता आटोपता घड्याळाचा काटा भराभरा पुढे सरकत असतो. यानंतरचा वेळ साजश्रुंगारावर खर्च होणार असतो. या पुढील आपत्तीला घाबरत एखादी म्हातारी आजीबाई आतून अगं, लवकर आटपा, निघायची वेळ झाली असे ओरडत राहते पण तिच्या ओरडण्याला  कोणीही फारश्या  गांभीर्याने घेतेलेले नसते. सगळ्यांचे सगळे आटोपेपर्यंत मुहूर्ताची वेळ टळते की काय या विचाराने घरातील ज्येष्ठ घामाघूम होतात. पण घरातील भगिनीकृपेने हॉलकडे कूच करण्याचा हिरवा कंदील मिळतो.  
हॉलमध्ये साड्यांवर मारलेल्या परफ्युमचा , एसीवर फवारलेल्या सुगंधाचा,गजरयांचा,फुलांचा,नाश्ता-जेवणाचा असा संमिश्र दरवळ पसरलेला असतो. काही पाहुणे अगोदरच आलेले असतात. त्यांनी यजमानांच्या आगमनाची वाट न पाहताच नाश्याच्या टेबलाकडे धाव घेतलेली असते. थंड पेयांची फिरवाफिरवीही  सुरु झालेली असते. दोन्ही पक्षाकडील लोकांची लगबग सुरु झालेली असते. अनुभवी माणसे त्यांना सूचना देत आपापला भाव वधारून  घेत असतात. फोटोग्राफर क्लिकच्या प्रतीक्षेत असतात. काही माफक विधी पार पडल्यानंतर स्टेजवरील दोन भटजी एकदम उठून आंतरपाट धरतात. जो तो मुठीत  लपविलेल्या रंगीत अक्षताची उधळण वधू-वरांच्या डोक्यावर करण्यास पुढे सरसावतो. करवल्या वधू-वरांच्या मागे आपल्या भविष्याचे असेच काहीसे स्वप्न पाहत अमाप उत्साहाने उभ्या राहतात. वधूची आई स्टेजवरून काही काळापुरती नाहीशी होते. भटजी मंगलाष्टके माईकवरून रेकतात. काही उत्साही मंडळी भटजी बरोबर त्यांचेही कानाला झिणझिण्या आणणारे  गानकौशल्य दाखवतात. एकदाचे लग्न लागते. सी.डी वर ढोलताशे वाजतात. अक्षता टाकून टाकून दमलेली मंडळी एकदाची खुर्चीवर विसावतात. एव्हाना  खुर्च्यांच्या मागे बुफेच्या टेबलावर आकर्षक भांड्यांतून जेवणाची मांडणी सुरु झालेली  असते. जेवणाच्या वासाने पोटात भूक खवळलेली असते. पेढे खाऊन झाल्यावर आता काय करायचे हा प्रश्न बहुतेकांना पडलेला असतो. तिथे स्टेजवर वधू-वराकडील मंडळी विवाहोत्तर विधी उरकण्यात बिझी असतात. तेव्हा या पार्श्वभूमीवर लोकांच्या माना थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाठी वळून जेवणाचा अंदाज घेत असतात. काहींना जांभया येत असतात. काहीजण कंटाळलेल्या चेहऱ्याने कधी एकदाचा जेवतो आणि घरी जाऊन पसरतो असे स्वगत बोलत असतात. काही वेळासाठी वधू-वर स्टेजवरून दडी मारून त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये अंतर्धान पावतात. यजमान पाहुण्यांना आता जेऊन घ्यायला हरकत नाही असे सांगतात आणि बुफेच्या टेबलांवर अचानक विलक्षण कल्ला होतो. लोक जेवणाच्या ताटांच्या दिशेने पी.टी.उषेपेक्षाही जोरात धावतात. आपला सामाजिक,आर्थिक स्तर विसरण्याची ही एक सर्वमान्य जागा असते. अनेक पदार्थांची रेलचेल असते. आपल्या बिचाऱ्या एकुलत्या एका पोटावर ताण येतोय का नाही ह्याकडे कानाडोळा करत समोरचे फुकटात मिळालेले अन्न ज्याला त्याला हापसायचे असते. त्यात आहेराची भानगड नसेल तर सोन्याहून पिवळे!  मुख्य जेवणानंतर आईस्क्रीम, तांबुल सेवन होते आणि एक लग्न सबंध पचविल्याचे समाधान पाहुण्यांना मिळते.  
आता एवढे भरपेट जेवण झाल्यानंतर वधू-वरांना आहेर आणि आशीर्वाद देण्यासाठी भल्यामोठ्या रांगेत उभं राहायचं अनेकांच्या जीवावर आणि डोळ्यांवर आलेलं असतं. त्यात पुन्हा स्टेजवर भेटायला जाणाऱ्या प्रत्येक ग्रुपचा फोटो! त्यात प्रत्येकाच्या आकारमानाप्रमाणे काहीजण फोटोत येणार नाहीत म्हणून त्यांचे वेगळे फोटो ! त्यामुळे उपाशीपोटी,थकलेले वधू-वर , झोपाळलेले पाहुणे आणि सकाळपासून फोटो काढून काढून थकलेला फोटोग्राफर या रसायनातून फोटो निघतात. 
अशी लग्ने बारमाही चालू राहतात.  केशभूषा-वेशाभूषांना अंत नसतो. वधूवरांना आशीर्वाद आणि आहेर  देण्यात रस असो वा  नसो, अनिर्बंध जेवण्याचा हक्क आम्ही असाच बजावीत राहतो. 


Thursday 29 September 2011

धरिला असा छंद

आम्ही शाळकरी पोरं असताना आम्हाला हटकून निबंधाचा विषय असायचा, माझा आवडता छंद. मग प्रत्येकाचे वेगवेगळे छंद यानिमित्ताने निबंधाच्या वहीत लिहिले जायचे. वाचन, गाणं, नृत्य ,पर्यटन,चित्रकला, रंगीबेरंगी शंख-शिंपले जमविणे, फुलझाडे लावणे, वेगवेगळ्या देशांचे stamp जमविणे, नकाशे गोळा करणे, मोरपिसे जमविणे, क्रिकेट अथवा बुद्धिबळ खेळणे, नट-नट्यांचे फोटो गोळा करणे, रंगीत गोट्या जमविणे, सुवासिक रब्बर तयार करणे अशा आणि यासारख्या अनेक गोष्टींचे छंद निबंधवहीत उमटायचे. मग हाच छंद चांगला कसा ? यामुळे आपला  वेळ  कसा सत्कारणी लागतो ? वगैरे गोष्टींचे स्पष्टीकरण देऊन निबंध संपवायचा. पुढे लौकिकार्थाने मोठे झाल्यावर हे लिखित छंद निबंधवहीतच बंदिस्त राहायचे. ती मिटलेली पाने काही परत उघडायचीच नाहीत. 
आजकाल या छंदांची व्याख्या बरीच बदलली आहे. घरोघरी वेगळेच छंद जोपासले जाऊ शकतात. जी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा आपल्या आवडीखातर करतो त्याला छंद असे म्हणतात. कालामानपरत्वे छंदांच्या कसोट्या ,त्याची परिमाणे बदलली आहेत. फर्निचर परत परत पुसणे हाही छंद होऊ शकतो. घरातून बाहेर जाताना कुलुपात किल्ली बराच वेळ घोळवणे, अनोळखी माणसांकडे बघून उगीचच हसणे आणि ओळखीच्यांना ओळख न देणे हाही छंद असू शकतो. प्रात:काळी  दारावर येणाऱ्या दुधवाल्याशी तेच तेच रटाळ वाद उकरून काढणे, कार पार्किंगवरून गुराख्याशी हुज्जत घालणे, इस्त्री,कचरा,पेपर,घरकाम या महत्वपूर्ण कामे करणाऱ्यांशी ते आपले गतजन्मीचे वैरी असल्यागत भांडणे हेही छंद माणसाला असू शकतात. रस्त्यावर येताजाता पचापच थुंकणे हा तर एक भारताचा राष्ट्रीय छंद आहे. वाहतुकीची सोय म्हणून रेल्वे खात्याने आंदण दिलेल्या लोकलमध्ये भाज्या चिरून त्याचा कचरा नि:संकोचपणे टाकणे, घाणेरड्या चित्रांनी आणि मजकुरांनी लोकलच्या भिंती सुशोभित करणे हाही छंद वर्षानुवर्षे निष्ठेने जोपासला जातो. 
आमच्या ओळखीच्यांपैकी एका गृहस्थांना खुर्च्या सरकवण्याचा छंद आहे. म्हणजे खुर्च्या या टेबलाभोवतीच फेर धरून असाव्यात याविषयी कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही परंतु यातील एखादी खुर्ची जरी काही कारणपरत्वे कोणीही इतस्तत: हलवली की गेलाच यांचा पारा वर!  तिची जागा बदलायचा हक्क कोणालाही नाही.  काही जण सारखे ओटा पुसत असतात. ओट्यावर पाण्याचा एक थेंबही यांना विचलित करू शकतो. अंथरुणावर पडलेली एखादी सुरकुती घरातील कलहाचे कारण ठरू शकते. त्यामुळे हे महाभाग पुन्हा पुन्हा चादर घालण्याचा खटाटोप करत राहतात. काहींना औषधांच्या गोळ्या खाण्याचा छंद असतो. काहीजण कानात इयरफोन्स घुसवून चित्रविचित्र चेहरे करून हातवाऱ्यांच्या सहाय्याने गुणगुणत सकाळी व्यायाम सद्दृश असं काहीतरी करताना दिसतात. 

काहींना दुसऱ्यावर करवादण्याचा छंद असतो. काहींना कुचाळक्या करण्याचा छंद असतो. काहींना सकाळी तीनतीन तास देवाची पूजा करून घरातील इतर कामे चुकवण्याचा छंद असतो. काही ज्येष्ठ व्यक्तींना इतर तरुणांना न्याहाळण्याचा छंद असतो. त्यांच्या डोळ्यांचं आणि एक्सरे मशीनच काम एकच असतं. इतरांच्या आरपार बघणे. देशाच्या सीमेवर गस्त घालायचा विचार यांनी जरूर करावा. नुसत्या बघण्याने शत्रूला चीतपट करतील. काहींना हातात टी.व्हीचा रिमोट घेऊन सारख्या वाहिन्या बदलण्याचा छंद असतो. काहींना पसारा करण्याचा छंद असतो . काहींना रस्त्यावरचे खड्डे मोजण्याचा छंद असतो . काहींना सारखे भाज्यांचे भाव विचारण्याचा छंद असतो. काहींना दुकानांची नावे वाचण्याचा छंद असतो. काहींना बागेतील सुंदर हिरवळीवर कागदाचे कपटे करून टाकण्याचा छंद असतो. काहींना रिक्षाची नंबर प्लेट लिहून ठेवण्याचा छंद असतो.  काहींना निगुतीने केलेल्या  स्वयंपाकाला नाके मुरडीत जेवायचा छंद असतो. काहींना चिल्लर खुळखुळविण्याचा  छंद असतो. काहींना अंग कराकरा खाजवायचा छंद असतो. 
यांतील किती छंद विधायक आणि किती छंद विघातक हे ज्याचे त्याने ठरवायचे! काही काळानंतर या अशा निरर्थक छंदांची सवय जडते आणि मग त्याचे रुपांतर व्यसनात होते. शालेय  निबंधवहीत लिहिलेले निबंध आपल्याला हसत असतात. आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आपल्याला खुणावत असतात. आपल्या भीषण छंदांच्या आहारी जाऊन आपल्या कपाळावर वेडा असं शिक्का मारून घ्यायचा की निबंधवहीतील छंदांची मनमोहक फुलपाखरे अंगाखांद्यावर खेळवायची आणि त्यांच्या रंगांची सुखद उधळण आजूबाजूच्या आपल्या लोकांवर करायची या निवडीचे स्वातंत्य्र ज्याचे त्याचे! 

Tuesday 27 September 2011

पन्नाशी

पंचवीस सप्टेंबरला रात्री दीड वाजता मी माझ्या वयाची पन्नाशी पूर्ण करून एक ऐतिहासिक टप्पा ओलांडला. त्यामुळे सव्वीस सप्टेंबर रोजी मी अधिकृतपणे पन्नास वर्षांची झाल्यामुळे लोकांच्या अभिनंदनास पात्र झाले होते. सकाळपासून मोबाईल वाजू लागला. जो तो मी पन्नास वर्षांची झाल्याचे त्याच्या अभिनंदनपर कौतुकातून मला सुचवू पाहत होता. काही ज्येष्ठ व्यक्तींना हळूहळू माझे वय त्यांच्या जवळ किंवा त्यांच्या दिशेने सरकत असल्याचे पाहून सुप्त आनंद होत होता. ही आता आमच्या पंक्तीत आली असा लबाड आनंदही काहींच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. 
सकाळपासून मी फोन उचलण्यात माधुरी दीक्षितच्या सेक्रेटरीपेक्षाही जास्त व्यस्त होते. पन्नासाव्व्या वाढदिवसाबद्दल   अभिनंदन!  ज्याला त्याला धन्यवाद देताना मला वाटत होते की मला पन्नाशीपर्यंत नेण्यात माझे कर्तृत्व ते काय? लोक पंच्याहत्तरी गाठतात, नव्वदी गाठतात कारण कुठलाही आजार, अपघात, नैसर्गिक आपत्ती त्यांना तोपर्यंत गाठत नाही म्हणून. माझ्या आयुष्यात प्रथमच मी पन्नाशीचा अनुभव घेत असल्याने थोडीशी हुरळूनही गेले होते.  कशी असते ही पन्नाशी ? ती आपल्याला तुझे उमेदीचे दिवस आता सरले असे म्हणून वाकुल्या दाखवते की आता तुझं सरतं वय म्हणून तुला काळजी घ्यायला हवी अशी गंभीर सूचना देते?  आत्तापर्यंत खूप काम केलंस आता थोडी विश्रांती घे असं सांगते की यापुढेही कामात व्यस्त रहा अन्यथा वांझोट्या चिंतांनी मेंदू आणि मन पोखरून निघेल असं सांगते? ऊन-थंडी-वाऱ्यापासून स्वत:चा बचाव कर असं सांगते की "स्टील यू आर यंग" असं सांगते? सर्दी-खोकला-ताप अंगावर काढू नकोस असं सांगते की वारंवार डॉक्टरकडे जाण्याइतकी  तू वयस्कर झाली नाहीस असं सांगते? अरबट-चरबट ,आंबट-चिंबट खाऊ नकोस ,बाधेल असं सांगते की खाल्ल्यावर निदान शतपावली घाल असं सांगते? आता चिडचिड ,रागावणं ,धुसफूस कमी कर असं सांगते की राग काबूत ठेवण्यासाठी योगा, ध्यान, नामस्मरण कर असं सांगते?    
तिशी-चाळीशी-पन्नाशी- साठी -सत्तरी पार केलेली कित्येक माणसे माझ्या अवतीभवती वावरत आहेत. त्यांच्यात असा काय बदल झाला आहे? असा प्रश्न मला पडला. वयाच्या अगदी विशी-तिशीत हट्टी, आडमुठी,अहंकारी, तिरसट,कुचकट ,विक्षिप्त, कारस्थानी वागणारी माणसे साठी-सत्तरीतही तशीच वागताना आढळतात. फक्त ज्यांच्याशी असे वागायचे ती माणसे,ती पिढी बदलत राहते. आई-वडील,भावंडे यांची जागा सासू-सासरे,दीर-नणंदा घेतात, पुढे पोटची मुले ,त्यानंतर नातवंडे अशा पिढ्या ,घरे बदलतात पण स्वभाव आचंद्रसूर्य राहो तसाच असतो. काही माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नासावा म्हणून सतत कार्यरत असतात. काही माणसे असुयेच्या भावनेने थबथबलेली असतात तर काही माणसे इतरांना कस्पटासमान लेखण्यात इतिकर्तव्यता मानतात. काही माणसे उगाचच इतरांच्या चिंता करण्यावाचून आयुष्यात दुसरं काहीच करत नाहीत. हे असं सगळं असताना केवळ शारीरिक वय वाढलं म्हणून नेमका कसला आनंद साजरा करायचा? 
सकाळी उठून बगीच्यातील फुलांशी बोलायचं सोडून  दुधवाला ,कचरेवाला,कामवाली  यांच्या प्रतीक्षेत आपण किती वेळ घालवतो? रात्री झोपताना मन आणि चित्तवृत्ती शांत करणारं मृदू संगीत ऐकण्याऐवजी टी.व्ही. मालिकांमधील इतरांच्या भानगडी, त्यांचे डावपेच, त्यांची रडणी ऐकण्यात आपण धन्यता का मानतो? आपल्याच मुलांशी सुसंवाद साधण्याऐवजी नेमके त्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांच्याशी वाद का उकरून काढतो? देऊळ या पवित्र जागी जाऊन आपल्याला निर्व्यंग जन्म दिल्याबद्दल, आत्तापर्यंतच्या आयुष्यात व्याधीमुक्त,व्यसनमुक्त,आर्थिक चणचणमुक्त ठेवल्याबद्दल त्या जगनियंत्याचे  आभार मानायचे सोडून आपण आपापल्या सुनांच्या कागाळ्या करण्यात का सुखावतो? आपण डोळस असूनही आपल्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी नजरेआड का करतो? आपण बहिरे नसूनही आपल्या स्वभावाबद्दलची इतरांची मते केवळ अहंकारापायी आपण ऐकून न घेता त्यात योग्य तो बदल का  करत नाही? आपण हाती-पायी धड नव्हे भक्कम असताना तिने किंवा त्याने आपल्यासाठी अमके करावे,ढमके करावे म्हणून का हट्ट धरून बसतो? 

वय वाढल्यानंतर माणसाची परीपक्व्वता वाढत नसेल, त्याची क्षमाशीलता , शांत वृत्ती वाढीस लागत नसेल,  आपल्या माणसांची जगण्यातली धडपड समजून घ्यायचा  तो किंवा ती प्रयत्न करत नसेल , आपल्या विचित्र वागण्यापायी दुसऱ्यांची होत असलेली घुसमट,होरपळ त्याला जाणूनबुजून दिसत नसेल तर त्या बुजुर्गपणाचे, त्या ज्येष्ठपणाचे का अवडंबर माजवायचे? 
शेवटी आपल्या आयुष्यातला  एक दिवस कमी झाल्याची जाणीव करून देणारा वाढदिवस दुसऱ्याच्या आयुष्यातील सुखाचे क्षण वाढवण्यात खर्ची पडला तरच तो खऱ्या अर्थाने अभिनंदनीय होईल असे मला मनापासून वाटते.

Monday 26 September 2011

कवितेचा कारखाना

हे शीर्षक जरा विचित्र वाटेल तुम्हाला पण त्याला माझा नाईलाज आहे. मला एका मिटींगसाठी बोलावणं आलं. काही कवी आणि कवयित्री त्यात सहभागी होणार होते. एका शाळेत आम्ही एकत्र जमलो. आम्हाला एक कल्पना सुचवली गेली. वर्गावर्गात जाऊन मुलांना कविता करायला शिकवायच्या. यातून नवकवी निर्माण होतील, काव्याविषयी आत्मीयता वाढीस लागेल, मराठी भाषा वाचेल आणि कवित्व वाहत राहील हा उदात्त हेतू मनात बाळगून कुणीतरी हा भयानक घाट घातला होता. सर्वात कळस म्हणजे या उपक्रमाचे नाव होते- कवितेचा कारखाना. 
कारखाना हा वाहनांचा असतो, खेळण्यांचा असतो, विद्युत उपकरणांचा असतो, शस्त्रास्त्रांचा असतो असे आजपर्यंत मी ऐकले होते. पण कारखाना हा कवितेचाही असू शकतो ही माहिती मला अगदीच नवीन होती. नाण्यांच्या टाकसाळीप्रमाणे कवितेचीही टाकसाळ का असू नये असा प्रश्न एखाद्या कवीच्या मनात नक्कीच आला असणार. टाकसाळीतून भराभरा शब्द उपसायचे आणि ते कारखान्यातील एखाद्या यंत्रात टाकून त्यातून भसाभसा कविता ओतायच्या अशी एखादी नवकल्पना कुणाच्या तरी मनात विजेसारखी चमकली असणार. या कल्पनेने मी अंतर्बाह्य थरारले. लोक किलोंच्या भावाने कविता विकत घेण्यास रांगेत केव्हाचे तिष्ठत उभे आहेत असे काल्पनिक दृश्यही माझ्या डोळ्यांसमोर तरळले.    
एक होता काका-त्याला भेटला बोका किंवा एक होता हरी-त्याला दिसली परी, एक होता भाऊ-त्याला मिळाला खाऊ, एक होता धोंडू-त्याने टोलविला चेंडू अशा कवितांचे मुखडे माझ्या डोळ्यांसमोर रुंजी घालायला लागले. वर्गावर्गातील इतिहास,भूगोल,गणित,शास्त्र हे विषय बाद होऊन त्याजागी फक्त मराठी कविता हा एकमेव विषय दिसू लागला. शिक्षक आणि विद्यार्थी काव्यजोडणीच्या नादात गर्क होऊन गेले. अनुभवी कवींच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि विद्यार्थी शाळा नामक कारखान्यात  बसून  कवितांची मॉडेल्स तयार करू लागले. आकर्षक कवितांना बाजारपेठेतून मागणी येऊ  लागली. कवितांचे उत्पादन, आयात,निर्यात, जाहिराती , चढाओढ , निर्देशांक असे काही व्यापारी शब्द आणि संदर्भ मनाला घेराव घालू लागले. 
केशवसुतांनी स्वप्राणाने फुंकलेली तुतारी कारखान्यात तयार होऊ लागली, हिरव्या मखमालीवर खेळणारी  बालकवींची फुलराणीही बाजारात तयार होऊ लागली. खानोलकर,मर्ढेकर, कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला शह देणारी प्रतिभा कारखान्यात तयार होऊ लागली. इंदिरा संत,पद्मा गोळे,संजीवनी मराठे, बहिणाबाई,शांत शेळके अशा कवयित्रींना तुल्यबळ अशा यांत्रिक कवयित्री कारखान्यात तयार होऊ लागल्या . 
 फक्त मीटरमध्ये लिहिल्याने किंवा  केवळ यमक जुळवल्याने एखादी गोष्ट काव्य अथवा कविता या सदरात मोडत असेल तर अशा प्रकारची कविता लिहिणारे व ती पाडणारे शेकडो कवी रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली आहेत. अशा  कवितेचा आणि प्रतिभेचा दुरान्वयानेही संबंध नाही. कवितेचा विशिष्ट छंद ,त्यातील गेयता , त्यातला गर्भित अर्थ हे सर्व समजण्याचा खटाटोप मग का करायचा?  "जन पळभर म्हणतील हाय हाय - मी जाता राहील कार्य काय?"  या कविवर्य भा.रा.तांबे यांच्या ओळी केवळ हाय आणि काय हे यमक जुळविण्यासाठी लिहिल्या गेल्या होत्या?  "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे - क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे "  यातल्या फक्त डे चे यमक जुळविण्याच्या प्रयत्नापायी बालकवींनी एवढी कविता खर्ची घालावी?  "अता राहिलो मी जरासा जरासा- उरावा जसा मंद अंती उसासा" या कवी सुरेश भटांच्या अंतरीचे गुज उलगडून सांगणाऱ्या  काव्यपंक्ती केवळ सा चे यमक जुळविण्याच्या हव्यासापोटी रचल्या गेल्या की काय? असा प्रश्न मला पडला. 
एखादा विचार मांडण्यासाठी वेगवेगळे साहित्यप्रकार वापरले जातात. कुणी  कथेचे  ,कुणी कादंबरीचे  तर  कुणी कवितेचे माध्यम वापरतात. त्या विशिष्ट  विचाराच्या बीजाची व्याप्ती किती आहे यावर त्या वाग्मय प्रकारचे स्वरूप अवलंबून असते. कविता हे माध्यम संक्षिप्त असले तरी सोपे खासच नाही. कवीला नेमके काय म्हणावयाचे आहे तेही मोजक्या शब्दांत , गेयता,आशयघनता राखून हे काही येऱ्यागबाळ्याच काम नाही. कवी आपल्या काव्यातून वैचारिक क्रांती घडवू पाहत असतो. सामाजिक  प्रबोधन करू पाहत असतो. अशा प्रकारची क्रांतिकारक शाब्दिक तुतारी फुंकण्यासाठी त्यात त्याला स्व-प्रतिभेचे प्राण ओतावे लागतात. त्याला अंतरीच्या तारा स्व -प्रतिभेने झंकारु द्याव्या लागतात. विरहव्यथित मनाला स्व-प्रतिभेचे पाझर फुटावे  लागतात. कवितेचे मीटर जपण्यापेक्षा त्याला त्यातील भावनेची खोली जपावी लागते. प्रेरणा,संवेदना या रोपट्यांना प्रतिभेचे खतपाणी निष्ठेने घालून काव्यफुलोरा फुलवावा लागतो. तरच अशी एखादी कविता रसिक हृदयाचा ठाव घेऊ शकते.  दुसऱ्याच्या वेदनेवर हळुवार फुंकर घालू शकते. 

करून शब्दांची आरास 
सजविते मखर कवितेचे 
आत मूर्ती भावपूर्ण 
असे लेणे दिव्यत्वाचे 
हे दिव्यत्व, ही प्रतिभा स्वर्गीय असते, अनुपमेय असते आणि म्हणूनच ती कुठल्याही बाजारबुणग्याच्या कारखान्यात किलोंच्या हिशेबात तयार होत नाही तर प्रतिभेचा परिसस्पर्श झालेल्या संवेदनशील मनात, हृदय मंदिरात तयार होत नाही तर स्फुरण पावते.

Sunday 11 September 2011

तेथे कर माझे जुळती



जसा फुलांना सुगंध असतो तसा गाण्यांनाही असतो. लताचं मोगरा फुलला हे गाणं, आशाचं प्रभाते सूर नभी रंगती हे गाणं आणि सुमनच पक्षिणी प्रभाती चारीयासी जाये हे गाणं प्रात:कालचा सुगंध  घेऊन येतं. माझ्यासारख्या अनेकांची मंगल प्रभात या स्वरांबरोबर सुरु होते. लता-आशा-सुमन या आवाजांच्या त्रिवेणी संगमात अनेक पिढ्या नखशिखांत न्हाऊन निघाल्या. दिवस त्यांच्याबरोबर सुरु होतो, मध्यान्हीलाही त्यांचेच सूर शीतलता देतात  आणि रात्रीलाही त्यांच्याच सुरांची सोबत हवीहवीशी वाटते. देश-भाषा-प्रांत-सीमा-वर्ण-जात या सर्वांच्या पलीकडे जात हे निखळ स्वरांचं चांदणं अहोरात्र बरसत असतं. चंदन कसं सहाणेवर जितकं उगाळाव तितकं दाट होतं त्याचप्रमाणे लता-आशा-सुमन या तिघींचे स्वर जितके आत झिरपतात तितकी त्यांच्या स्वरांशी आपली बांधिलकी अधिक गहिरी होत जाते. त्यांच्या गाण्यांची मोजदाद तरी कशी करायची? त्यांच्या गाण्यांतून लुटलेला आनंद कोणत्या परिमाणात मोजायचा? 
  लताचं जयजयवंती रागातील मनमोहना बडे झूठे, भैरव मधील जागो मोहन प्यारे, बिहाग मधील तेरे सूर और मेरे गीत , यमन मधील जिया ले गयो जी मोर सावरिया,पटदीप मधील मेघा छाये आधी रात ,मधुवंती मधील रस्मे उल्फत, सोहनी मधील कुहू कुहू बोले कोयलिया किंवा भैरवी मधील सावरे सावरे ही आणि अशी अवीट गोडीची असंख्य गाणी म्हणजे कानसेनांसाठी कुबेराचा खजिना आहे.
 आशाचं अबके बरस भेजो भय्याको बाबुल, काली घटा छाये मोरा जिया तरसाये, छोटासा बालमा,कतरा कतरा जीने दो , झूठे नैना बोले, ये क्या जगह है दोस्तो, यू सजा चांद, रुदाद -ए- मुहब्बत , सलोना सा सजन है अशा  कितीतरी गाण्यांवर आपण आपलं हृदय ओवाळून टाकलं आहे.  
सुमनच जुही की कली मेरी लाडली, दिल एक मंदिर है, अजहून आये बालमा, न तुम हमे जानो, गरजत बरसत सावन आयो रे, एक आग सी वो दिलमे , मेरे आसुओ पे नजर न कर अशा एकाहून एक सरस गाण्यांनी आपले कान तृप्त केले आहेत.
लता-आशा-सुमन या नितळ-निखळ स्वरांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आहेत. मराठी अभंग असोत ,भावगीते असोत, गझल्स असोत,अंगाई-गीते  असोत ,लावण्या असोत, देशभक्तीपर गीते असोत वा बालगीते असोत एकेका गाण्याचं रत्न करून ते रसिकांच्या हृदयाच्या कोंदणात बसवण्याच कसब या त्रयीकडे आहे. 
आज या तिघी शारीरिक दृष्ट्या वार्धक्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत हे सत्य जरी स्वीकारलं तरी अनेकांचं असहाय,जर्जर वार्धक्य या तिघींच्या स्वरांच्या सोबतीने सुसह्य झालं आहे. काळवेळ , दुखणी-खुपणी, एकटेपणा विसरायला लावणारं हे स्वरांचं रामबाण मलम आहे. माझ्या मनाला व्यापून राहिलेले त्यांचे सूर मला अंतर्मुख करतात . अंगणातल्या तुळशी-वृन्दावनापुढे ज्याप्रमाणे आपण भक्तिभावाने हात जोडतो त्याप्रमाणे त्यांच्या स्वर-सामर्थ्यापुढे मी आदराने नतमस्तक होते. अशा वेळी कविवर्य बा.भ.बोरकरांच्या ओळी आठवतात. 

                                                           दिव्यत्वाची जेथ प्रचीती 
                                                             तेथे कर माझे जुळती 



Thursday 8 September 2011

दिवसाची सुरवात .............

सकाळच्या निवांत वेळी हातात गरमागरम वाफाळता चहा आणि पुढ्यात चहाइतकच ताजं वर्तमानपत्र हि सामान्य माणसाची सुखाची संकल्पना आता कालबाह्य झाली आहे असे म्हणायला हरकत नसावी. अशासाठी की आजच्या धकाधकीच्या जीवनात निवांत  वेळ ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे . शिवाय सकाळी हातात येणारे वर्तमानपत्र हे आनंदाच्या नव्हे तर दु:खाच्या पुरवण्या घेऊन येते. 
 सकाळी हातातली कामं बाजूला टाकून वर्तमानपत्र उघडावं आणि निराश व्हावं असा हल्ली सतत अनुभव येत असतो. सत्तेसाठी चाललेल्या लांड्या-लबाड्या , राजकीय डावपेच , विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल , सर्व जीवनावश्यक वस्तूंचे चढते भाव, महागाईला कंटाळून संपविलेले आयुष्य, कर्जापायी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कौटुंबिक कलहातून होणाऱ्या हत्या , वाहनांचे भीषण अपघात व त्यात ठार झालेली मुले-माणसे, नापास झाल्याने आलेल्या वैफल्यातून मृत्यूला कवटाळणारी निष्पाप मुले, सामुहिक बलात्कारांचा रतीब, बॉम्बस्फोटात लुळी-पांगळी झालेली माणसे , सामान्य माणसांच्या डोक्यावरती घातपाताच्या टांगत्या तलवारी, पैशासाठी चोऱ्या-दरोडे, रस्त्यावर राहणाऱ्यांना निर्दयपणे आपल्या गाडीखाली चिरडणारे धनदांडगे, अंमली पदार्थांची तस्करी, रेव्ह पार्ट्यांमध्ये केलेला हैदोस, खच्चून भरलेल्या लोकलमधून पडून मरणारी माणसे, नक्षलवाद्यांच्या कारस्थानांना बळी पडणारे पोलीस व त्यांची उध्वस्त कुटुंबे, अतिरेकी पावसाने वाहून नेलेली गरिबांची घरे आणि त्यांची स्वप्ने, भूकंपाने जमीनदोस्त झालेल्या इमारती , ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीचा उडालेला बोजवारा, डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे पेशंट दगावण्याचे वाढलेले प्रमाण, पैशांच्या हव्यासापायी स्वत:ची नीती-चारित्र्य -बुद्धिमत्ता विकणारी माणसे, लोकांचे पैसे घेऊन पोबारा करणारे इस्टेट-एजंट , बेकारी,उपासमार,दारिद्र्य, तुंबलेली गटारे-नाले, प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित मुलीची केलेली पाशवी हत्त्या , एकट्या-दुकट्या बाईच्या घरी शिरून दागदागिने आणि पैशांच्या लोभापायी तिचा केलेला विकृत  खून, दुसऱ्याच्या बळकावलेल्या जमिनी, स्वच्छतेचे दुर्भिक्ष्य व त्यापायी फैलावणारी रोगराई,.कोर्टात वर्षानुवर्षे पडून असलेल्या केसेस आणि त्यापायी हतबल झालेले अशील, करिअररिस्ट आई-वडिलांच्या प्रेमापासून  वंचित राहिल्यामुळे एकलकोंड्या मुलांच्या वाढलेल्या मानसिक समस्या ,स्त्री-भ्रूणहत्त्या , बहुतांश स्टेशनवरील अरुंद पुलावरून रोज ये-जा करताना लाखो  घुसमटलेले-कावलेले जीव................................
या  सगळ्या बातम्यांमध्ये आनंददायी काय असते? बातम्या वाचायच्या ,पेपर हातावेगळा करायचा आणि स्वयंपाकघरात शिरून चुलीवरील आधणातून निघणाऱ्या वाफेसारखा एक कढत सुस्कारा सोडायचा. 
पण एखाद्या सणावाराला गणेशाची किंवा महिषासुरमर्दिनीची छबी मुखपृष्ठावर दिसते आणि नेहमीच निराश होणाऱ्या मनावर एक आशेचा प्रकाशदायी तरंग उमटतो. यापुढे तरी येणाऱ्या दिवसांची सुरवात चांगली होऊ दे अशी मी मनोमन प्रार्थना करते.

Wednesday 7 September 2011

(अ)वास्तव जाहिराती आणि आम्ही



घराघरांत टी.व्ही.चा उगम झाला आणि रस्त्यावरच्या होर्डींग्जवरील जाहिराती घराघरात बोकाळल्या. सिनेमागृहात प्रत्यक्ष पिक्चर सुरु होण्याच्या आधी जाहिराती दाखवतात तर टीव्हीवर मालिकांच्या आधी, मध्ये व नंतर असा तिन्ही त्रिकाळ जाहिरातींचा हैदोस चालू असतो. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचीही तीच परिस्थिती! बरेच जण मालिका बघता याव्यात म्हणून जाहिराती सहन करतात. जाहिरातींच्या वेळी आवाजाचा गळा दाबला जातो. जाहिरातींच्या वेळी घरातील उरलीसुरली कामे आटोपली जातात किंवा ही वेळ एकमेकांशी संवाद साधण्याची सुयोग्य वेळ समजली जाते. जाहिरातींच्या अवास्तव आक्रमणाच्या निषेधार्थ ही पावले उचलली जातात. काही जण किती बाई ह्या जाहिराती  म्हणून त्या जळल्या मेल्या जाहिरातींच्या नावाने सारखी बोटे मोडीत बसतात. एकूण काय जाहिराती या आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनल्या आहेत.
काही जाहिरातींमध्ये वेगवेगळ्या नट्या वेगवेगळे साबण आपल्या अंगाला घासत आंघोळ नामक काहीतरी करतात. लक्स,मोती,सिंथोल, संतूर यांपैकी कोणताही साबण चालू शकतो. संतूर मम्मी तर प्रत्येक आंघोळीगणिक अधिकाधिक सुंदर आणि इतकी तरुण दिसते की माधवनही तिच्यावर आणि मम्मी म्हणून तिला बिलगणाऱ्या तिच्या पोट्टीवरही फिदा होतो. मला सांगा की खरोखर किती नट्या हे इंडिअन साबण नामक रसायन आपल्या अंगाला हसत हसत लावतात? बरं, आंघोळ करतानाही यांचा मेक-अप अबाधित असतो. म्हणजे शुटींगवरून घरी आल्यावर रात्री ह्या मेक-अप ठेवून तश्श्याच झोपतात की काय असा प्रश्न पडावा. 
काही जाहिरातींमध्ये गार्नियर,लोरीयल,डोव्ह यांपैकी एखादा शाम्पू  ती आपल्या केसांना लावते. आणि एखादा चमत्कार व्हावा तसे तिचे केस इतके मऊ,मुलायम आणि सुळसुळीत होतात की ती आपल्या केसांना हेलकावे देत चालू लागते. मग तिला बघून इतर पोरींना नैराश्याचे झटके येतात, पोरे धुंद होत तिच्या भोवती पिंगा घालू लागतात. आजकाल समजा जरी एखादीने असा चमत्कारी शाम्पू वापरला आणि ती बाहेर जात केसांना हेलकावे देऊ लागली तरी कोणता चाकरमानी बस-रिक्षा-taxi या त्रयींकडे  न बघता तिच्याकडे बघेल?  
यानंतर भरपूर क्रीम्स, लोशन्स,फेस-पावडरी  चोपडून चोपडून या जाहिरात-सुंदऱ्या गोऱ्या गोऱ्या होतात. आधी त्या बरयाचश्या कळकट,काळ्याकुट्ट असतात व म्हणून घरच्य-दारच्यांकडून धिक्कारलेल्या व उपेक्षित असतात. काही दिवस या क्रीम लावतात आणि अहो आश्चर्यम! यांचे रूप निखरते. यांच्या रुपाची झळाळी पाहून सगळ्यांचे डोळे दिपतात. जो तो ह्यांना मागणी घालायला पुढे सरसावतो. खरच कुठे मिळतात अशी जादुई क्रीम्स? 
एखादा अवाढव्य, खादाड पोट सुटलेला माणूस चिकन खा खा खात असतो तेही अतिशय घाणेरड्या पद्धतीने. खाऊन झाल्यावर तो धौतीयोग का कायासस चूर्ण घेतो. सक्काळी सक्काळी सुफडा एकदम साफ की परत हादडायला मोकळा असा एकूण त्याचा अविर्भाव असतो. अहो पण वाट्टेल तसं खावं आणि पोटाच गटार करावं हा काही चांगला संदेश आहे का?  
माधुरीताई, सोनालीताई बिचाऱ्या नटून-थटून  येऊन तुमच्या-आमच्या भल्यासाठी भांडी घासण्याच्या द्रावणाची जाहिरात करतात. मुळात जी भांडी या स्वत:च्या सुपर-व्हिजनखाली घासून घेतात ती एवढी घाण,मचकटलेली का असतात? त्यावर नुसता चोथा फिरवता क्षणी  ती चमचम चमकायलाच लागतात इतकी की त्यात स्वत:चा चेहराही स्पष्ट दिसतो. आधी भांडी घाण करण्याचं कसब आणि मग ते धुण्याचं! 
 एक हुसैन नामक सेल्समन आगंतुकासारखा घरात घुसतो तोही थेट दुसऱ्यांचे कमोड साफ करण्याचा विडा उचलून! मग आधी गृहिणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तो प्रात्यक्षिक करायला लावतो आणि कमोड चकचकीत होतो , दुर्गंधीपासून मुक्त होतो. या आधी एक शेजारीण आत जाऊन नाक मुठीत धरून बाहेर आलेली असते आता ती परत आत जाते आणि यावेळेस मात्र ती हसतमुख चेहऱ्याने बाहेर येते.  काय ही हर्पिकची किमया! काय तो हुसैनचा चांगुलपणा! हल्ली प्रत्येकाचे सेल्फ कंटेंड ब्लॉक असताना कोणी कुणाकडे कशाला या पाहुणचारासाठी जाईल ? हा प्रश्न आपल्याला पडतो ,जाहिरातदारांना नाही.

लहान मुलांना ज्या गोष्टी समजू नयेत म्हणून समस्त आईबाप आटापिटा करत असतात त्या गुप्त,खाजगी गोष्टींच्या जाहिरातीही आजकाल कसलीही भीड-मुरवत न बाळगता टीव्हीवर दाखवल्या जातात. उदा. वयात आलेल्या मुलीला लागणारे एखादे साधन तिने कसे वापरावे , कश्या प्रकारे त्याची ठेवण असावी ? ते ती वापरते , दिवसभर हुंदड हुंदड हुंदडते व रात्री सुखाने झोपते. जाहिरात संपते आणि मुलांनी विचारलेल्या प्रश्नांनी बिच्चाऱ्या आई-वडिलांची झोप मात्र उडते.
कुठलेसे कोल्ड-ड्रिंक एक नौजवान घेतो आणि इतका रिफ्रेश होतो की तो गाड्यांच्या टपांवर नाचतो, कड्यांवरून खाली स्वत:ला लोटून देतो. प्रेयसीही इम्प्रेस होते. एवढी ताकद जर कोल्ड-ड्रिंक  मध्ये आहे तर मग फ्लेवर्ड दुधाच्या जाहिराती का दाखवतात? 
कालांतराने जुन्या जाहिरातींची जागा नव्या जाहिराती घेतात. हा सिलसिला असाच चालू राहतो. काहीजण त्याला कंटाळतात, काहीजण त्याच्यापासून नवीन बोध घेतात. हे जाहिरातींचे तथ्य नसलेले भ्रामक युग बघत बसण्याशिवाय किंवा ते बघण्याचे टाळण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्यायच नसतो.

Thursday 1 September 2011

"रिएलिटी शोज" च्या मोहजालात हरवलेले गाणे


आज कुठल्याही वाहिनीवर बघावं तर गाण्याचं नुसतं पेव फुटलेलं आहे. जो येतो तो गातो. गा गा गातो. परीक्षक तोंड फाटेपर्यंत स्तुती करतात. गाणाऱ्यांना अस्मान ठेंगणं होतं. त्यांचे आईबाप हुरळतात. जळी-स्थळी त्यांच्या गाण्यांचा बोलबाला होतो. शास्त्रीय संगीतापासून ते पॉप गाण्यापर्यंत कुठलही गाणं ते लीलया गाऊ शकतात. मग काही संगीतकार त्यांच्याकडून आपल्या रचना गाऊन घेतात. त्यांच्या गाण्यांच्या सीडीज , आल्बम निघतात. ते सेलेब्रिटी या क्याटेगरीत आता मोडतात. त्यांचे लाईव्ह पर्फोरमन्सेस बघण्यासाठी लोक गर्दी करतात. त्यांचे रेट्स फिक्स होतात. संपूर्ण 'मेक -ओव्हर' झालेलं त्याचं 'ग्लामराइज्ड' रुपडं एखाद्या हिरो-हिरोईनला सुद्धा न्यूनगंड आणू शकतं. अशा प्रकारे सार्वजनिक उत्सवातील याचं स्थानही अढळ होतं . 
काही दिवसांपूर्वी कुठल्याशा वाहिनीवर एक चेहरा गाणं गाताना दिसला . मी डोक्याला ताण देऊन आठवू लागले. अखेरीस माझ्या लक्षात आलं की ती गायिका म्हणजे वैशाली भैसने-माडे आहे. उर्मिला धनगरला ही मी पटकन ओळखू शकले नाही. अभिजित सावंतने त्याचं कर्तृत्व गाजवायला आधी राजकीय पक्षाचा व नंतर कॉमेडी शोचा आधार घेतला. यांच्यासारख्या इतर सर्वच गायक-गायिकांनी स्वत:ला तपासणं खूप गरजेचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. चांगल्या गायकाने आजन्म गाण्याची साधना करायची की केवळ सेलेब्रिटीचं बिरूद स्वत;ला चिकटवून घेऊन आपल्यातील सच्च्या गायकाची घुसमट होऊ द्यायची. 
प्रत्येक 'सिंगर'ला सगळ्याच प्रकारची गाणी गाता यायलाच पाहिजेत हा जवळजवळ सर्व वाहिन्यांचा हट्ट तर माझ्या आकलना पलीकडचा आहे. त्यातून त्याची किंवा तिची म्हणे 'व्हरसेटालिटी' प्रूव्ह होते. यानुसार पाहायचे झाल्यास फक्त शास्त्रीय संगीताला वाहिलेले, फक्त नाट्यसंगीताला वाहिलेले, फक्त सुगमसंगीताला वाहिलेले कुणीही गायक व गायिका व्हरसेटाइल असू शकणार नाहीत.    
सुलोचनाताई चव्हाण आयुष्यभर लावणीच गात आल्या. प्रभाकर कारेकर,रामदास कामत हि मंडळी फक्त नाट्यसंगीताच गारुड समाजमनावर पसरवीत राहिली. किशोरीताईंनी शास्त्रीय संगीतातच स्वर्ग शोधला. मेहदी हसन, गुलाम अली आयुष्यभर फक्त गझलेचेच गुलाम होऊन वावरले. आपल्याभोवती एका ठराविक गान-प्रकाराची चौकट आखणे  हे गायकाच्या दृष्टीने काही कमीपणाचे लक्षण आहे का? 
कल्पना करा की "बालगंधर्व" फेम आनंद भाटे पुढील गाणी गातायत. १) हिची चाल तुरुतुरु २) पाणी थेंब थेंब गळ ३) अश्विनी ये ना ४) गालावर खळी ५) बघतोय रिक्षावाला . कसं वाटेल? कल्पना करा शास्त्रीय गायिका वीणाताई सहस्त्रबुद्धे पुढील गाणी म्हणताहेत. १) कोंबडी पळाली २) चमचम करता ३) ऐका दाजीबा ४) पिया तू अब तो आजा ५) रात अकेली है . कसं वाटेल? 
वरील उहापोह मी एवढ्यासाठी केला की प्रत्येकाच्या गळ्यात एक विशिष्ट गायकी असते. सगळेच जण महमद रफी आणि आशा भोसले नाही होऊ शकत. काही सन्माननीय अपवाद वगळता असे म्हणता येईल की आपल्या गळ्याला अनुसरून गायलेलं गाणं हे जास्त प्रभावी ठरू शकतं. लोकांवर जादूची कांडी फिरवण्यासाठी वाट्टेल ते गाणं गाण्याचा आटापिटा कशाला करायचा? 
रीएलिटी शोज मध्ये बऱ्याचदा परीक्षक म्हणतात की छान गायलास, दोन-तीन ठिकाणी सुराला घसरलास पण एकूण गाणं चांगलं झालं? म्हणजे नक्की काय? बेसूर झालेलं गाणं चांगलं कसं म्हणता येईल? सुराला घसरलेला गायक/गायिका  उद्याचा महाविजेता किंवा महाविजेती कशी होऊ शकेल?  त्यासाठी तिने किंवा त्याने सातत्याने गान-साधना करायला नको का?  मेक-ओव्हर केला, सादरीकरणावर अधिक भर दिला तरीही गाण्यातील उणीवा लपू शकतात का? या सर्व नवनवीन गायक-गायिकांना आपापले आल्बम काढायची एवढी घाई का लागून राहिलेली असते? परीक्षक झालेले संगीतकारही या व्यासपीठावर आलेल्या गायकांना संधी देण्यासाठी एकदम आतुर झालेले असतात. गायन क्षेत्रात स्वत:ला सिध्द करण्यासाठी जी समर्पणाची भावना आवश्यक असते की यांपैकी किती जणांच्या ठायी असते? स्पर्धांचे बाळकडू मिळालेले इतरांच्या पुढे जाण्यासाठी विविध गाणी म्हणण्याची केविलवाणी कसरत करत राहतात परंतु आत्मिक आनंद कधीही मिळवू शकत नाहीत. स्वत:च्या गाण्याकडे कधी  डोळसपणे पाहू शकत नाहीत. साधनेतील यथार्थता कधी स्वत:ला पटवून देऊ शकत नाहीत. परिणामी गाणे यथातथा आणि बाकीचाच बडिवार जास्त अशी अवस्था होते.
एक छोटेसे उदाहरण देते. एकदा पं.भास्करबुवा बखले याचं मैफिलीतील गाणं संपलं आणि एका रसिकाने त्यांना नाट्यसंगीत गाण्याची विनंती केली. भास्करबुवांनी ती नम्रपणे नाकारत म्हटलं की मा. कृष्णराव आज इथे उपस्थित आहेत. नाट्यसंगीताची तालीम त्यांना मिळाली आहे. माझ्या गळ्याला ती तालीम नाही. तेव्हा श्रोतेहो मी सर्वांच्या वतीने त्यांना नाट्यसंगीत गाण्याची विनंती करतो. नाट्यसंगीत गायचे नाकारल्याने भास्करबुवांची संगीत क्षेत्रातील महती काही कमी झाली नाही किंवा त्यांची शास्त्रीय संगीतातील तपश्चर्याही डागाळली नाही. उलट त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. 
"all that glitters is not gold" या उक्तीचा प्रत्यय आज जवळजवळ प्रत्येक रीएलिटी शो बघताना येतो असे खेदाने म्हणावेसे वाटते.